Friday 29 January 2021

मी स्टॅच्यु केलं माझ्या लिबर्टीला

मी वाचला नाय वाचला पेपर

मी स्कीप केली न्यूज चॅनेल्स

मी ऐकली नवीन नवीन गाणी युट्यूब वर

मी स्क्रोलून प्यायले न्यूज फीड फेबूचं

OTT नि तासंतास पाहिले माझे डोळे

नि मोबाईल चार्ज होईपर्यंत

माझ्या पगाराने घेतली माझी काळजी


मग कोणाच्या हक्काच्या वार्ता चालल्यात?

मग कोणत्या देशात होते आहे लोकशाहीची हत्या?

मग कोणत्या जातीच्या बाईची होते शेतात भाजावळ?

मग विद्यापीठांच्या वावरांत ट्रॅक्टरने नांगरायचं तरी कशासाठी?

हे सगळं आपल्याला चघळत राहत असताना

थुंकलेही जात नसू यातून कधीच जरतरमग...

मग पांढऱ्यावर काळ करणाऱ्या पोष्टींना 'सामायिक' तरी का करायचं!


माझ्या ताटात पडेल अन्न

माझ्या अकाउंट वर मिळेल लोन 

मला जातीचं कुठे काय

मी बायनरीतलं निवडून एक लिंग

घेतलं शिकून किपॅड बडवायला


बसलं गपगुमान घरात स्वतःची स्वतः करत क्रांती...

मग पडणारंच नाहीत दगड कोणाच्याच टाळक्यात!


असो

चालायचंच

बघवत नाही

सहन होत नाही

याला काही अर्थ नाही

काहीच होऊ शकत नाही

आपलं कोणाचं काही जात नाही

किती नि काय ऐका-वाचा-बोलायचं कळत नाही...

नि असलं काय नि काय

म्हणायला वाव देणारी

लिबर्टी

दाराच्या कडीसारखी

लावून टाकली की मिटतो प्रश्न आपल्यापुरता.


दारावर धडका बसू लागतात

अधूनमधून

उघडेल की काय

या भीतीपोटी

मी स्टॅच्यु केलं माझ्या लिबर्टीला.


-प्राजक्ता

#...

Wednesday 2 December 2020

माझं मरण.

माझं जगणं तू ‘डीकोडून’ सांगू नये तसंच #माझं_मरणंही.

तुझ्या त्या पावलांनी अमुक एक दगड तर धुडकावून लावला होता कि मग तमुक एका दगडाच्या ठेचेने इतकी काय म्हणून जखम करून घ्यायची तू ! हे मुद्दाम म्हणून तू ठरवत नाहीसंच...


पण मी सुद्धा तुझ्यासाठी ते ठरवू नये.  

निर्णय तुझा असताना,

तुझ्या विचारांच्या शिवाशिवीमध्ये माझा बघ्ये म्हणून पण सहभाग नसताना,

तुझा निर्णय

निव्वळ त्या निर्णयाचे नाम माहित्ये म्हणून

त्यावर बोलण्यासाठी त्याच्या अलीकडे आहे म्हणून

लिहिता वाचता आणि टाईपता येतं म्हणून

आताच्या क्षणात भावना आणि विचारांच्या रस्सीखेचेने ब्रेक घेतलेला आहे म्हणून

या आयुष्यातसुद्धा ‘तसे’ क्षण आले पण बघ ‘निभावून नेलंय’ म्हणून

मी

निकालात काढते तुझं – त्यांचं सगळ्यांचंच #मरण.

हे विसरून

कि हे 'ते तसे' नि ते 'हे असे' यात साम्य नसतंच कधी.

तसे आणि तसेच जरी असले तरी बदलत जाते त्याची खोली उंची रुंदी घुसमट

माझ्या तुझ्यासाठी;

मी विसरते

कि माझं निभावलेलं काय किंमत घेऊन गेलं

का भरली ती किंमत

कोणी भरली

निभावल्या म्हणून भावल्या का सगळ्याच वाटा?

मी निभावलं याचं तुला कौतुक आहेच

पण मी जेत्त्याच्या आवेशात मागत राहते तुझ्याकडून तुझ्या निर्णयांचा हिशोब...

तू इथे नसताना.

कारण मला दिसत राहतं

मी मागे घेतलेलं पाउल

किंवा

कधीच न सोसावी लागलेली ती दिशा.

मला होता येतं कोर्ट

आणि म्हणता येतं तुला मूर्ख, भेकड

गुन्हेगार

हे विसरून कि मला कधी कोणाच्या

पुनर्वसनाचं केंद्रही होता आलेलं नाही.


-प्राजक्ता


#एकमुक्तती.


#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते

Monday 11 May 2020

'ब्रेक के बाद...???...

पडल्या पडल्या किंवा तोल गेल्याच्या क्षणाला आपला पहिला प्रयत्न असतो की हाताला येईल ते धरून स्वतःला सावरणे...
कधी सावरतो आपण स्वतःला तर कधी फसतो प्रयोग...
कधी पडणं इतकं गंभीर नसतंच की प्रयोग फसला तरी काही नुकसान व्हावं आपलं...
कधी तंगडं मोडून हातात पण येऊ शकतं इतकं लागतं.

अचानक आलेला हा काळ...ही परिस्थिती...
अनिश्चितता !
या सगळ्यातून प्रत्येक जण स्वतःचा तोल सावरत आहे.
ज्यांनी सावरला ते तो टिकवण्याचा प्रयत्नात आहेत.
आपापले डिफेन्स मेकॅनिझम शोधून काढले आपण.
सोशल मीडिया चॅलेंजेस झाले,
इनो-मैदा-रवा संपवणाऱ्या पाककला स्व-स्पर्धा झाल्या,
आधी 'विषयां'साठी 'वेबिनार्स' मग 'वेबिनार्स'साठी 'विषय' घेऊन झाले...

या साऱ्यात "Stay at home' ला कंटाळण्याची "luxury" असणाऱ्या आम्हाला कोणीतरी
"Safe at home ...Not stuck at home" पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला.

...'तथाकथित' 'सामान्य'पणे 'विनाव्यत्यय' (?) चालू असणाऱ्या जीवनाच्या प्रवाहात,
अचानक खंड पडल्याने झालेली उलाढाल प्रचंड असली तरी आतापर्यंत मिळालेल्या सक्तीच्या सवडीमुळे 'भविष्यातील नव्या नॉर्मल'चा विचार...
खरंतर पुनर्विचार करायची वेळ आणि जबाबदारी आपल्यावर आहे.

जबाबदारी का असे विचारालं तर भाकरीच्या चंद्रासोबत रेल्वेखाली आलो नाही आपण...
ते टाळू शकलो नाही आपण...
तर किमान त्यानंतर उरलेल्यांचे आयुष्य सुकर असणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी खारीचा का होईना पण स्वतःचा वाटा उचलावा ही 'किमान मूलभूत क्षमता' असू शकते माणूस म्हणवून घेण्यासाठी...

दूर दूर पर्यंत कधी शक्यता म्हणूनही ज्या मनात आल्या नसतील त्या या काळाने खऱ्या करून दाखवल्या आहेत...
दर महिन्याला / आठवड्याला / दिवसाला नवीन वस्तूंचा भरणा करणारे आपण सुरुवातीला नाराजीसह,
मग जागरूकपणे मिनिमॅलिस्टिक जीवन शैलीशी जवळीक साधत जगायला शिकलो...
कारण प्रश्न 'सरव्हायवलचा' होता...
टिकून राहण्याचा.

जेव्हा स्वतःला टिकवायचं असतं तेव्हा
कितीही घट्ट मुळं रोवलेल्या धारणा बदलायला वेळ लागत नाही
हे या काळातलं महत्वाचं फलित आहे.
'स्वतःला टिकवणं' याची व्याख्या जितकी व्यापक होत जाईल तेवढं समूह/समुदाय/प्रजाती म्हणून मनुष्यप्राणी टिकणं शक्य होईल हे ही या काळात अधोरेखित झालेलं आहे.
पण 'समाज' म्हणून या काळाच्या कसोटीवर किती खरे उतरलो आपण याचं उत्तर काय??

आतापर्यंत 'समूहा'च्या भावनेलाच 'समाज' मानून खपवल्या आपण खूप गोष्टी...
मिळालेला हा 'अवकाश' किमान
'ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात...' असा रोजचाच
आणि त्यामुळेच सरावलेला,
कळला न कळल्यासारखा ठरणार नाही...
एवढं आपण (किमान) बघूया.

-प्राजक्ता
#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते...

Sunday 22 March 2020

टिकून राहताना...

टिकून राहायला समूहाचा भाग असल्याची खात्री करत राहावं लागतं.
त्यासाठी जबाबदाऱ्यांचे अतिसुलभीकरण करणाऱ्या म्होरक्याचा फार उपयोग होतो.

अर्थात इथे समूहाने म्होरक्या वापरला स्वतःच्या जीवाच्या शांतीसाठी, गिल्टट्रीपमधल्या शॉर्टकटसाठी, दिवसभराचा त्रागा बाहेर पाडण्यासाठी कि म्होरक्याने वापरून घेतले समूहाला कशाकशासाठी…

भावनेचं राजकारण नको म्हणतो आपण …
पण भावनाच राजकारण असली तर?
प्रत्येक भावनेला सत्ता हवी असते आपली. स्वतःची मालकी.

म्हणजे माण्साचं टिकणं हे स्व-च्या आणि समूहाच्या भावनेच्या राजकारणाच्या पटण्या-न-पटण्यानुसार ठरत असावं का?...

लांब,वेगळं, अंतरावर राहूनही समूहाशी जोडलेलं आहे असं वाटण्याच्या मागील असुरक्षिततेचं भांडवल करून एकदा सामुहिकाच्या भावनेचे पुन्हा रिचार्ज केलं म्हणजे मग आपापल्या ‘छिद्रांत’ जायला नवी उर्जा मिळते कि कारण ?

जबाबदाऱ्या प्रतीकांच्या रुपात सजवायला बऱ्या पडतात. मिरवता येतात. निभावाव्या लागत नाहीत.


- प्राजक्ता.

Sunday 12 January 2020

काळ.

काळाच्या कुठल्या प्रहरी
आपण जागं व्हायचं हे कळत नाही.
कोणत्याही एका प्रहराची निवड केलीत
तर मग इतर वेळेला कुठे होती तुमची जागरूकता
हे विचारायला घड्याळांचे अनेक काटे धजावतात.
त्यांना रोखता येत नाही...
कारण त्यांनी ठरवलेल्या दिशेने
ते जात येत राहत असतात.
त्यांचं 'चालू असणं' हेच त्यांच्या प्रामाणिकता किंवा तत्सम आदर्श मूल्यांचं प्रशस्तीपत्रक असतं.
त्याला सलाम करावा हे गृहीतच.
हे निर्विवाद.

तर,
काळ भीषण आलाय.
आपण भीषण झालोय किंवा आपण
: तुम्ही-आम्ही सगळेच.
मुळचेच भीषण आहोत
हे आता फक्त उघड्यावर यायला लागलं आहे.

काळ 'माहिती'चा आहे.
तथ्ये गोळा होताहेत.
विखुरली जात आहेत.
शिवाय, काळाला 'तंत्रज्ञाना'ची जोड आहे.
जी तथ्ये आवडत किंवा पटत नाहीत ती बदलली जात आहेत.

जागं व्हायचं तर मग सगळी तथ्ये तुम्हाला माहिती हवीत.
त्यावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव तुम्हाला कळायला हवा.
तथ्याचे तथ्य तपासण्यासाठी
पुन्हा आधार म्हणून
नवी तथ्ये शोधायला यायला हवीत.

मिळाली नाहीत? सवड नाही? शक्य नाही?
मग विश्वासाच्या आधारे धरायची एखादी पारंबी.
मुकाट्याने.

'जगबुडी होणार' या सुंदर आशेवर
वाट पहायची
निसर्ग खवळेल पाणी बनून.
काळ लोटेल...
काळाला लोटेल...
आणि पूर्ववत होईल
व्यक्तीविरहित समष्टी
तेव्हा कळेल
कोणी धरलेल्या पारंब्या आणि टिकले एकीने...
आणि कोण फसलं
नि सुटून गेलं प्रवाहातून ...
काठ्यांना आपलं मानून.

-प्राजक्ता.
#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते.

Wednesday 6 February 2019

कथा असतात....

कथा असतात.
तुम्ही लिहा/वाचा/बघा/मांडा अथवा नका लिहू/वाचू/बघू/मांडू... तुम्ही कितीही दुर्लक्ष केलं तरी त्या सुरू राहतात शेवटापासून सुरुवातीपर्यंत.
हो.
शेवटापासून सुरुवातीपर्यंत.
काहीतरी एक घडतं/संपतं/थांबतं त्यातून पुढे चालू राहतो सगळा कारभार.
जे आहे ते कसे होते किंवा काय होईल याचा विचार म्हणजे कथा वाटते आपल्याला.
जे आहे ते तस्सेच्या तस्सेच कथा वाटणे हा साक्षात्कार वाटण्याजोगा दुर्मिळ प्रसंग...
शिवाय एक कथा अनेक पैलू घेऊन येते की एकच एक कथा हा आभास असतो आणि खरंतर अनेक जणांच्या अनेक कथा...म्हणजे एकास अनेक अशा प्रमाणात. त्याचं सुलभीकरण करत राहतो आपण. आपल्याला वाटत राहतं हे आपल्या सोयीचं असतं पण हा खरा चकवा असतो...त्यात आपणच नाही तर आपल्या अवतीभवतीच्या लोकांपासून आपल्याशी व्यक्तिशः संबंध नसणारे पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामाजिकाशी संबंध असणारे, सामाजिक तपासून काहीतरी मांडू/बदलू/स्थितीशील ठेऊ पाहणारे या सगळ्यांनाच हा चकवा बाधक ठरतो.

सुरुवात आपण आपल्याच कथेपासून करावी का?
माझी गोष्ट काय?

माझ्या कुटुंबाच्या नजरेतून? मैत्रपरिवाराच्या? शेजाऱ्यांच्या? तश्या जवळच्या पण खरंतर लांबच्या लोकांच्या किंवा अशा लांबच्या पण खरंतर जवळच्या लोकांच्या नजरेतून?
या अनेक झाल्या असतील तर थोडं थांबू इथे.
पुन्हा चाळू प्रत्येकाची नजर.
नजर; मला वाटणारी की त्यांना काय वाटते हे सांगणारी...किंवा नजर; खरंच जर कधी त्यांच्या तोंडून/शब्दांत त्यांना जे वाटतं ते सांगणारी...

'त्या' अनेकांचे वर्ग/घन होतील हळूहळू... परत परत.

श्वास घेऊ एक दीर्घ नि आता सगळ्यात अनोळखी व्यक्तीकडे जाऊ...स्वतःकडे.
माझ्या नजरेतली माझी गोष्ट काय?
काल आणि उद्या मध्ये फरक असेलंच म्हणा पण आज आताची तरी एकच एक भेसळमुक्त पारदर्शक गोष्ट मांडायला कधी जमेल आपल्याला?
किती वेळ जमेल आणि तेही
कोणत्या परिस्थतीत जमेल?...

ती वेळ आपल्याला सापडो,
ते स्थैर्य आपल्याला लाभो,
त्या परिस्थितीचे दीर्घकाळ लाभार्थी म्हणून काळ आपली नोंद करो...
या साक्षात्काराचे धनी आपण सर्व एकाच क्षणी होऊन तो क्षण चिरकाळ टिकून राहो...
❤️

-प्राजक्ता.
#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते...

Thursday 11 October 2018

#MeToo पेक्षा आजच्या समाजाचे आभार __/\__

एक स्त्री म्हणून या काळाचे आभार मानावे वाटतात.
माझ्यातल्या घडत गेलेल्या स्त्रीला जागा करून
देणाऱ्या समाजाचे म्हणजेच तुमचे आभार मानावे वाटतात.

'बाईच बाईची वैरी असते' हा परवचा श्री/अ वगैरे गिरवायच्या आधीपासून आत्मगत करत मोठ्या होत असताना सुद्धा प्रवासात आजूबाजूला एखादी तरी बाई असली तरी हायसं मानत बाया हिंडल्या,
बाथरूमला जाताना सुरक्षितता म्हणून बायकांच्या घोळक्यात जायला संधी शोधत राहिल्या,
बाई दिसत नाही तोपर्यंत जीव मुठीत घेऊन कामं करत राहिल्या...
पुरुषांच्या पंगतीतून उठवून लावू नये म्हणून 'बायका कशा नखरेल असतात' या पुरुषांच्या बोलण्यात हामी भरत आपल्या तोंडचा घास काढून घेतला जाणार नाही याची काळजी घेत राहिल्या...
भानामती झाल्यासारख्या म्हणत राहिल्या की भेदभाव होत नाही... नोकरी सांभाळून  घरंचं काम करत राहणं, आई बनणं , त्याग वगैरे करणं हेच बाईपण.

पण आधी ब्र उच्चारु न शकणाऱ्या बाया शिकल्या सवरल्या,
ज्या अक्षरं नाही शिकू शकल्या त्या लढणं शिकल्या...तगनं शिकल्या... बोलू लागल्या.
आता तुम्ही समाज म्हणून त्यांना झिडकारून लावत असलात, खोटारड्या ठरवत असलात, त्यांच्या नोकऱ्या त्यांचे जीव धोक्यात आणण्याच्या धमक्या देत असलात, सोशल मीडियावर गलिच्छ शिवीगाळ करून,ट्रोल करून, मानसिक हिंसा ते शारीरिक हिंसेपर्यंत अशा विविध मार्गाने जात त्यांचं तोंड दाबून गप्प करण्याच्या प्रयत्नात असलात तरी...
तरी मला एक स्त्री म्हणून या काळाचे पर्यायाने तुमचे आभार मानावे वाटतात.

आज मायबापाने नाही ऐकलं तर अनोळखी बाया किंवा बाप्ये आहेत कार्यकर्ते/अधिकारी/संस्था म्हणून बाईच्या हुंकाराला ओ देणारे...
आज एकेक बाई उभी राहतेय 'मी सुद्धा' म्हणत
ती एकटी नाही याची हमी देत इतर बायांना, मुलींना बोलण्यास प्रवृत्त करतेय.
हा, बऱ्याच जणांना वाटतंय तरी आता हे 'मी टु' चं नवं फॅड आलं आहे, फेमस व्हायला या बाया काहीही खोटे नाटे आरोप करतात ताकदवान पुरुषांवर असे म्हणताहेत पण-
"काय प्रकारची प्रसिद्धी मिळते या अशा बोलण्याने? ज्या बाया बोलताहेत त्यांच भविष्यात काय होतं? आणि ज्या पुरुषांविषयी बोलतात त्यांच्या भविष्यावर सोडा पण त्यांच्या वर्तमानावर कितपत परिणाम होतो??" असे प्रश्न विचारणारे वाढताहेत, आत्मपरीक्षण करणारे बोटावर मोजणारे का असेनात पण ते आपलं अस्तित्व टिकवून ठेवताहेत किंवा आपण असे म्हणूया की समाज म्हणून तुम्ही तशी संधी त्यांना देताहात...

आज फेसबुकने अनोळखी लोकांनी मला माझे कपडे/शरीर/फोटो यावर केलेल्या अश्लील मेसेजेस सतत दिसणार नाहीत याची काळजी घेतली आहे,मला जेव्हा ते पाहावे वाटतील तेव्हा मी पाहून त्यावर हसू शकते किंवा रिपोर्ट करू शकते... आज रस्त्यावरच्या माझ्यावर कमेंट करणाऱ्या मर्दांना मी काहीच करू शकत नसले तरी सोशल मीडियावर त्यांना ब्लॉक करू शकते... अगदीच म्हणायचं झालं तर आज माझ्या न्युज फीड वर माझ्याच माहितीतल्या एखाद्या व्यक्तीने कोणतेही असंवेदनशील वक्तव्य केल्यास त्यांना अनफॉलो करू शकते.
वास्तविक आयुष्यात व्हर्च्युअल सारखं लॉग इन आणि लॉग आऊट करणं सोप्पं नाहीच पण किमान १० वर्षे , १६ वर्षे गेल्यावर का होईना मला नाकारलं गेलेलं काम मिळू शकतं, माझ्या भीतीवर मी मात करून पुन्हा ब्र उच्चारू शकते...
यासाठी तुम्ही समाज म्हणून जो वर्तमानपत्रातला रकाना देताहात मिडियातली जी स्पेस देताहात, चहाच्या टपरीवर आम्हा बायकांना येड्यात काढण्यासाठी का होईना पण चर्चेतून तुमचा वेळ देताहात... घरात बसून बातम्या बघताना आपल्या घरातल्या बायकांच्या बाबतीत असे घडत असेल का? त्यांचं या बाबतचं खरंखुरं मत काय असेल हे विचारत नसाल पण किमान तो विचार पूर्णतः झिडकरण्यापूर्वी एका सेकंदासाठी तरी त्याकडे चोरून का होईना, घाबरत का होईना तुम्ही बघायला लागला आहात...
बाया खोटे नाटे आरोप लावतील असा विचार करून का होईना पण बाईला चोरटा स्पर्श होणार नाही याची काळजी घेताहात,
जर तसा स्पर्श तुमच्याकडून झालाच चुकून तर माफी मागत आहात...
ज्यांना गर्भात मारता नाही आलं त्यांना रस्त्यावर बिनधास्त फिरायला मिळणाऱ्या  आयुष्यासाठी त्या बायांनी तुमचं ऋणी राहिलं पाहिजे या आवेशापासून हळूहळू लांब येताहात...

मुद्दा निव्वळ अलोक नाथचा नाही, मी महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र माझा असल्याने नाना पाटेकरांचा तर त्याहूनही नाही...मुद्दा तुमच्या-आमच्यातल्या पुरुष आणि स्त्री या आदिमत्वाचा आहे हे समजून घेण्याच्या दिशेने समाज म्हणून रांगायला लागला आहात... नर आणि मादी यापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून एकमेकांची दखल घेण्यापर्यंत आपला समाज पोहोचायला आणखी बराच काळ जाईल; पण तिथपर्यंत आपण पोहूचू या विश्वासाची ज्योत पेटवायला लागणाऱ्या वात, तेल , काडेपेटी इत्यादी साहित्याची जुळवाजुळव करायचा काळ सुरू झाला आहे...
म्हणून. आणि निव्वळ म्हणून एक स्त्री म्हणून या काळाचे आभार मानावे वाटतात.
#धन्यवाद.

तळटीप: जन्मभरात जितक्यांदा दादर स्टेशनला गेले तितक्यांदा माझ्या अंगावर फिरलेल्या हातांचे ठसे माझ्याकडे नाहीत.
बस मध्ये बसल्यावर मागच्या बाजूने आलेल्या हातावर जेव्हा मी फटका मारून ओरडले होते तेव्हा त्या काकांनी तसं काही केलंच नाही असं म्हंटल्याने त्याचाही पुरावा माझ्याकडे नाही...
प्रवासात कॉलेजमधल्या मुलींना मागून घसट करताना जेव्हा मी एका पुरुषाला पाहिलं तेव्हा फोटो काढायचा राहिला...
रेल्वेच्या डब्यात एकही बाई नाही,प्रवास लांबचा आणि रात्रीचा; आपली पोरगी सकाळी व्यवस्थित पोहोचेल का या चिंतेने ग्रासलेल्या माझ्या वडिलांच्या डोळ्यांचा स्क्रीनशॉट काढता आला नाही...
नाहीतर पुरावे बरेच देता आले असते.
पण हेही नसे थोडके की जगण्याचा ताण हलका करायला इथं फेबु वर येऊन कोणताही व्हीडिओ/कागद वगैरे पुरावा म्हणून नसताना इथपर्यंत वाचलं तुम्ही.

पुनश्च #आभार ...

-प्राजक्ता
#metoo

Wednesday 8 February 2017

पोकळीतून...

~१~
>>निव्वळ 'कष्ट' करण्यातच मेहनत असते या गोष्टीवरचा विश्वास उडालाय आता. आराम-लादलेला आराम किंवा आळसही निभावून नेणे फार कष्टाचेच. पार थकून जातो आपण. दिवसाअखेरीस अंग दुखून निघतं. शिवाय झोपेचेही तीन-तेराच वाजतात! कष्ट-बिष्ट केल्यावर म्हणे पडल्या-पडल्या झोप लागते.
तेही इथे नाही.
यादरम्यान "दिनक्रम वगैरे नसतो" किंवा "एकदमच ढिसाळ  कार्यक्रम असतो" म्हणाल तर शुद्धिवर या!! कार्यक्रम अगदी चोख ठरल्याप्रमाणे पार पडतो; शरीर-मनाचं आंबत जाणं...विनाव्यत्यय.<<


~२~
"कित्तीsss" बोलतो आपण!
आपण सगळेच. शेकडोने असणाऱ्या बातम्यांच्या वाहिन्यांचे पत्रकार, माइक हातातून खाली ठेवतच नसावेत बहुधा. ऑलिंपिकच्या मशालीसारखे एकमेकांकडे सोपवत असावेत ते!
"यावर तुम्हाला काय वाटतं?" "तरी तुमचं मत,अंदाज काय?"...माणसं विचारत असतात,
माणसं उत्तरं देत असतात.
विचार कोण करतं आणि ऐकतं कोण?
याचा शोध चालू आहे.
टाचणी मारल्यावर भळाभळ रक्त येऊ लागावं तशी व्यक्त व्हायला- नव्हे- खरंतर नुसती बोलायला संधी शोधत असतो आपण. नाटक,चित्रपट,मालिका यातली स्वगतंही मोठमोठाल्या आवाजातच हवीत आपल्याला!
3मिनट्स पॉपकॉर्न्स सारखंच;
वाटलं काही- टाक बोलून- वाटलं काही- टाक बोलून
अशी शीघ्र प्रतिक्रियावादी जनता कधी झालो आपण कळलंच नाही! 'आज'च्या  घटना/दुर्घटनेवर कोणी दोन दिवसांनी संयमित विचार करून sms करून पहावा इतरांना किंवा सोशल मिडियावर शेअरुन पाहावे इतक्याsss 'उशिरा'...'अश्मयुगीन' म्हणून शिक्का बसेल तो कायमचाच. म्हणून मग त्या भावनांची तिव्रताही अशी पॉपकॉर्नसारखी तुडतुडीत आणि हलकी. "दोन सेकंदही मागे येऊन पाहणे;म्हणजे काळाच्या मागे पडणे" असं वाटणारा हा काळ!

ता.क. - 'काळा'च्या पुढचा विचार करायला हल्ली 'वेळ' कुणाकडेच नाही.

~३~
कागदाचा शोध कधी लागला माणसांना?
आणि नात्यांचा??
या दोघांची सरमिसळ कधी झाली? का  झाली?
माणसाच्या असण्या-नसण्याचा कागदाशी काय संबंध? पिकलेले केस, वाकलेली कंबर यापेक्षा पासष्टी उलटली हे कागदावर छापील असेल तरच खरं.
एक कागद - एक सही आणि तुम्ही एकमेकांचे "आहात" चे "होतात" होता.
माझ्या असण्याचा पुरावा -कागद.
I think therefore I exist...वगैरे सगळं फूलीश.
'कागद' दाखव नाहीतर स्वतःचेच श्राद्ध घाल. श्राद्धानंतर, भटाला दक्षिणा म्हणून द्याव्या लागणार्‍या नोटाही कागदच!
अर्थात हा कागद अभिजन (Elite);
'सगळ्या जीवनावश्यक कागदां'ची सोय करू शकणारा!

~४~

विचारांची जुळवाजुळव जमेनाशी झाली की
आपण वस्तूंची जुळवाजुळव करायला घेतो.
म्हणजे पुस्तके आवरणे,कपडे घडी करणे इत्यादि इत्यादि.
किमान काहीतरी आपल्याला ठरवल्यासारखं व्यवस्थित रचता येतंय याचच काय ते समाधान...

~५~

एखादी जखम सुकली का ? भरली का हे पाहायला त्यावरची खपली दुखत असतानाही काढायाची आणि मग भळभळ वाहणाऱ्या जखमेने तिचं भरून न आलेलं अस्तित्व दाखवून दिलं की हळहळायचं,औषध शोधत फिरायचं...
विचारांचही तसंच.
जे विचार दडपायचेत त्यांना आपणच कटघर्यात उभं करायचं. फिर्यादी वकील आणि न्यायाधीशही आपणच. मग कितीतरी काळ आपण खटला चालू ठेवणार. आरोपी म्हणून का होईना पण ज्यांना नाकारायचंय त्या विचारांना मनोपटलावर एक अढळ जागा देणार!
'बरं' तसंही वाटत नाही अन् असंही...



-प्राजक्ता
#पोकळीतून

तळटिप:: कोणत्याही प्रकारच्या राजकीय आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक,कौटुंबिक,नैतिक वा अनैतिक किंवा नातेसंबंधाच्या वगैरे सत्तेची सूत्रे वा खुद्द सत्ता वा तिची शक्यता असे काही म्हणजे काहीच हातात नसताना... स्वतःची जागा, त्या त्या जागेचे व्यवस्थांमधील स्थान किंवा संपूर्ण व्यवस्थाच;यांमधे असूनही नसताना अनुभवास येणाऱ्या #पोकळीतून केलेले हे लिखाण !
(साधारण ४-५ वर्षांपूर्वीचे लिखाण असल्याने काही संदर्भ जुने येतील)

Wednesday 1 February 2017

'ती'चे जगणे...१

वाचायला सुरुवात केलीच आहे आपण तर याचा अर्थ 'ती' अर्थात कोणतीही स्त्री, मग ती तुमची माँ-बेहेन असो वा नसो,तीच्या जगण्याविषयी खुलेपणाने जाणून घ्यायला आपण तयार आहोत; या गृहितकाच्या आधारे आपला संवाद होत राहील हे आधीच मान्य करून घेऊ. तिच्या जगण्याचे इतके अनेक पैलू असताना नेमका कोणता मुद्दा आधी मांडला जाईल?

"स्त्री हक्क जाणीव ? हुंडा? सरपंच-पती? नेहमीचीच झालेली छेडखानी/अश्लील चाळे व स्पर्श? बलात्कार? सिनेमातील तिच्या जगण्याचे एकांगी दर्शन? अगदी डबल ग्रॅड असूनही सासरच्यांना पटत नाही म्हणून नोकरी न करणं? उद्दातिकरणाने ग्रासलेले मातृत्व? अवकाशात यात्रा करूनही पृथ्वीवरच्या लक्ष्मणरेषांनी घेरणं? क्रीडा क्षेत्रात टॉपला जाऊनही तिच्या स्कर्टची चर्चा होणं? तिला नकाराचा अधिकार आहे हे समजवण्यासाठी 2016 मध्ये अक्खा चित्रपट तयार करायला लागणं? आरक्षित जागा दिल्या म्हणून तिच्यासारख्यांना तुच्छेतेने बघणं आणि जागा न मिळाल्याने गर्दीत उभ्या बाईला शक्य तिथनं चाचपणं! शिकून सवरून समर्थ झालेल्या स्त्रियांना स्त्री चळवळ/स्त्रीवाद यांच्या आपल्या आयुष्यातील योगदानाचा विसर पडणं? स्त्रीवाद म्हणजे निव्वळ पुरुष द्वेष नाही हेच समाजाला समजवण्यात स्त्रीवाद खर्ची होणं? की कोणत्याही स्त्री वर कुठेही कसाही हल्ला झाला कि #not_all_men च्या टॅगाखाली चर्चेचा मुद्दा भरकटवणं?...."

कि याही पलीकडे अजून काही!!!

नेमकं कशावर बोलायचं या जागेत?

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील एक भिंत किंवा त्यावरील एखादा कोपरा म्हणाना! त्याचा सुदुपयोग नेमका कोणत्या एका मुद्द्यासाठी करायचा?

मुळात स्त्रीत्व मग ते आजचं असो वा कालचं हे या साऱ्या आणि यासारख्या अनेक पैलूंचं एकात्मिक (इंटीग्रेटेड) रूप आहे.

'ती'चं जगणंच काय तर मरणंही आपण या सगळ्यांतून वेगळं काढू शकत नाही. तुकड्यात पाहायचे म्हणाल तर एकतर फसाल तरी, नाहीतर फसवाल तरी.

'ती'चं जगणं समजून घ्यायचं असेल तर ते जुनाट पूर्वापार चालत आलेल्या कन्येच्या'दाना'च्या परंपरेपासून ते काल आता झालेल्या निश्चलीकरणात अडकून पडलेल्या ताई माई आत्या आई आजी काकी मामीच्या बाजूला/पितळेच्या डब्यात किंवा कपटातल्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या पैशाच्या प्रश्नापर्यंत सगळंच समजून घ्यावं लागेल. आजची स्त्री ही काही डायरेक्ट आभाळातून पडलेली नाही. तिच्यात, तिच्यावर, तिच्या आसपास अजूनही जुनाट बेड्या आहेत नाहीतर नवी सेफ्टी लॉक्स तरी! कधी दृश्य कधी अदृश्य. कधी तिच्या जाणतेपणात कधी तिच्याही अजाणतेपणात. कधीकधी तीने त्याकडे केलेल्या काणाडोळ्यात ती बंधने अजूनही रुतून आहेत.

जिथे बेड्या नाहीत तिथे त्यांचे व्रण आहेतच. स्वातंत्र्याची किमंत तिला चुकवावी लागतेच हे पटवून देणाऱ्या त्यांच्या तन-मन आणि चारित्र्यावरच्या खुणा या. आपल्या आसपासच्या त्या जरा आगाऊच/कमावते म्हणून स्वतःला शहाणी समजणाऱ्या/नवरा जिच्या ताटाखालचं मांजर आहे/ इतकी शिकली म्हणजे काय संसार करू शकणार नाही,हिला नवरा मिळणं कठीण आहे असं आणि या प्रकारच बरंच काही आपण ज्यांच्याबद्दल विचार करतो त्या आपल्याच आसपासच्या बायकांच्या जागी तुमच्याच ओळखीचे अथवा अनोळखी कोणीही पुरुष आहेत अशी थोडावेळ कल्पना करा. मग जी बाई आगाऊ वाटली असेल त्याजागेवरचा पुरुष बेधडक वाटेल, कमावणाऱ्या त्या जागेवर पुरुष असेल तर त्याने स्वतःला शहाणं का समजू नये? असा प्रतिप्रश्न काहीजण करतील. बायको नवऱ्याच्या ताटाखालंच मांजर असणं तर गृहितकच! कित्ती शिकलाय हा मुलगा!!याच्याशी लग्न होणारी मुलगी भाग्यवानच असणार बघा! असंही आपण म्हणू. ही कल्पना प्रामाणीक मनाने स्विकाराल तर कळेल "कुठे आहे आता स्त्री पुरुष भेद?" "जुन्या बायकांसारखं थोडीच काही त्रास आहे या आजच्या पिढ्यांना?" हे असले राग आपण आळवत बसणार नाही.

मुलाला बापाची चप्पल व्हायला लागली की बापाने मुलाशी मित्रासारखं वागावं म्हणतात. पण एखादी (त्याच वयाची समजा हवंतर) मुलगी आपली मते ठाम पण मांडू लागली की मग आपण म्हणणार- "चार बुका शिकली तर हिला शिंगे फुटली आता ! आमच्यावेळी नव्हतं बाबा/बाई असं." वगैरे वगैरे.

हे भेद आपल्या समाजात तुमच्या माझ्यात अजूनही आहेत हे मान्य करणं म्हणजे नाजूक भागाचं दुखणं करून ठेवलं आहे आपण. एकतर ते मान्य करायला वेळ घेतो. कसे का होईना पण मान्य केले तर मग त्याला लपवण्यावर,संस्कृतीच्या नावावर ते दडवण्यावर जोर देतो. मग आपण एकतर या बाया पुरुषांची जागा घ्यायला आल्यात असा आकांडतांडव तरी करतो किंवा त्यातूनही जर सद्सदविवेकबुद्धी जागरूक झाली तर प्रामाणिकपणे आपल्यातल्या चुकांच्या दुरुस्तीचा मार्ग स्वीकारतो.

निवड तुमची आहेच. पण त्या निवडीच्या तुमच्या निर्णयावर भविष्यातील भेदरहित समाजाची जडण घडण होणार की नाही हेही अवलंबून आहे. आपल्यावरची जबाबदारी ओळखून घेऊन तिचं जगणं समजावून घेऊया. लढा हा पुरुषाशी नाही. तर माझ्या आणि तुमच्यातल्या पुरुषसत्ताक मानसिकतेशी आहे हे लक्षात ठेवूया.


कुसुमाग्रजांनी देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिलेल्या 'फटक्यात' म्हंटले होते;

"समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका।

दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।"

इतक्या सामान्य शब्दात मांडलेले तत्वही आपल्यासारख्या अतिसामान्यांना आचरणात सोडा पण अजून विचारातही पूर्णतः उतरवता आलेले नाही.

अजूनही आम्ही स्त्रियांवरील अत्याचारांविषयी चर्चा करताना आम्ही कसे स्त्रीला मातेसमान मानतो,देवी म्हणून तिचा गौरव करतो आणि काय काय उदात्त हेतू त्यांच्याविषयी बाळगतो याचे नगारे पिटत राहतो! निव्वळ एक व्यक्ती म्हणून तिचा स्वीकार न केल्याने तिने केलेल्या सामान्य चुकाही मग संस्कृतीवर हल्ला म्हणवून घेतो. ज्या इंग्रजी/युरोपियन विचारधारांच्या परिचयामुळे भारतीय बुद्धिजीवी वर्गाला देशाच्या पारतंत्र्याविरोधात लढण्यासाठी प्रेरित केले त्याच किंवा तत्सम विचारांच्या प्रभावाखाली, जागतिक चळवळींच्या आधारे जेव्हा देशातील स्त्री आपल्या स्त्रीत्वाच्या पारंपरिक बेड्यांविरोधात उभी राहते तेव्हा मग 'हा सगळा पाश्चात्य संस्कृतीचा अनिष्ट परिणाम' असल्याचं आपण म्हणू लागतो. बरं परदेशात कोणत्याही स्त्रीवादी चळवळी झाल्या असल्या तरी 'स्त्री-पुरुष समानता' हा जगप्रसिद्ध ग्रंथ ताराबाईंनी भारतातच लिहिला! निव्वळ स्त्रीशिक्षणाचाच नाही तर दलितातील दलित असणाऱ्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या फातिमा शेख याही (आता विश्वास ठेवायला कठीण जाईल पण ) पुरोगामी म्हंटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच होऊन गेल्या. त्यामुळे उठसूट पश्चिमेकडे बोटे दाखवणारे लोक अनायासे स्वसंस्कृतीलाच कमी लेखत असतात हे त्यांनाही कळत नाही. कळून घ्यायचेही नसते म्हणा. कारण ताराबाई शिंदे सहज विस्मरणात घालवता येतात आणि फुले दाम्पत्याला त्यांनी मुलींसाठी अमुक साली अमुक ठिकाणी शाळा उघडली, अमुक गल्लीतून जाताना शेणाचे गोळे खाल्ले असे तुटक तुटक सोयीचे उदात्तीकरणाचे खेळ खेळता येतील इतके तुकडे लोकांच्या तोंडावर टाकत राहिले कि मग बदलाची शक्यता नाकारताही येते आणि पुरोगामीत्वाचा मुखवटा मिरावताही येतो.

जाहिरातबाजी जबरदस्त जमली की मग तत्वांच्या अंमलबजावणीकडे कोणी बारीक लक्ष तसेही देत नसते. एकदा फक्त गावाबाहेर पाटी लागली की हा गाव हगणदारी मुक्त आहे, दारुमुक्त आहे तर मग बाहेरून जाणाऱ्यांना वाटत राहते कि 'जमलं बुवा यांना!'आणि आतल्यांना घाण दिसत जरी असेल किंवा दारूच्या भट्ट्या दिसत जरी असतील तर ते एकतर या कारणासाठी गप्प राहतात कि त्यांना वाटत राहतं कि या एखाद दुसऱ्याच घटना आहेत किंवा या कारणासाठी गप्प राहतात कि जाऊदे ना उगा याची वाच्यता करून गावाची बदनामी कशाला?

पण त्यामुळे प्रश्न सुटलेला नसतो.

तर प्रश्न सोडवायचा असेल तर त्याचं असणं हे प्रथम स्वीकारावं लागतं. एकदा ते स्वीकारलं कि मग त्याबद्दलचा न्यूनगंड न बाळगता त्यावर उपाय योजना शोधावी लागते. ती शोधून राबावल्यावरही बराच काळ त्याचा पाठपुरावा करावा लागतो. कोणताही सामाजिक प्रश्न हा जसा एका रात्रीत सुटत नाही तसाच तो कायमचाही नष्ट होणे शक्य नाही. तो आपली रूपे बदलून डोके वर काढत राहणार! पण म्हणून त्याला नाकारून तो आपणच दूर होईल असे मानणे बाळबोध होईल फारच.


तर,एकुणात असे आहे की उद्याच्या पिढीतील बदलत्या काळात वाढणाऱ्या  मुलींना तसेच मुलांनाही भविष्य सुसह्य करून ठेवायचे असेल तर आजपर्यंतच्या 'ती'चा प्रवास , त्याची गती आणि दिशा या सगळ्याशी आपली ओळख होणे सर्वांच्याच हिताचे आहे. हा प्रवास कोणी आपल्या बोटाला धरूनच घडवून आणावा असे नाही. तो तुमचा तुमचा तुमच्या घरापासून, कुटुंबातील स्त्रियांपासून, शेजारणी/आसपासच्या महिला/ चित्रापाटातील काम करणाऱ्या नायिका ते विविध कंपन्यांच्या संचालिकांपर्यंत कोणाचाही प्रवास एक व्यक्ती म्हणून आपण पाहू लागलो कि आपलाही समानुभूतीच्या मार्गे एक नवा प्रवास नक्की सुरु होईल. त्यासाठी शुभेच्छा कायमच आहेत. :)

-प्राजक्ता.

तळटीप :
सदरहू लेख हा नवाकाळ या वृत्तपत्रात दिनांक २९जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे.

Sunday 6 November 2016

त्या_आशयाभोवती...

लिहायला घेते मनातल्या मनात बऱ्याचदा.

कधी समोरच्या भेदरलेल्या नजरांमध्ये हरवून जातात वाक्ये, तर कित्येकदा निश्वासांसोबत बऱ्याच गोष्टी सुटून जातात .
बऱ्याच गोष्टी करायच्या असूनसुद्धा हातून काही होत नसते आणि सतत व्यस्त असूनही मागे वळून पाहिलं की डोंगर सोडा स्वकर्तृत्वाची एखादी टेकडीही दिसत नाही.
सालं साधं टोकाचं निराशावादीही होता येत नसतं, मग असलं तसलं,काही बाही, छूटूक मुटूक करत राहायचं.
झिजत राहायचं चंदनही न होता.

आत्मभान, साक्षात्कार अशा शब्दांच्या भेंड्या खेळत राहायचं स्वतःशीच! राज्य आपल्यावरंच; आपणच दिलेलं. पकडायचं आपणच - आपल्यालाच! अचंबा वाटावं असं सारं काही असताना कशाचंच काहीच वाटू न देता
रडीचा डाव खेळत राहायचं न जिंकता.
लिहिण्यापूर्वीच शब्दांची निरार्थकता कळत जाताना डिलिट होत राहतात अनेक शब्द पण बोलण्यापूर्वीची त्यांच्यातल्या अनेकांची निरार्थकता का कळू नये हा प्रश्न पडत राहातो...नको तेव्हा! मग लिहिणं टळत असताना कधी बोलणं टळत राहतं आपलं आपणच. मुके होत नसलो आपण तरी सोयीची मौनं घेरतात आपल्याला. त्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या तीव्र शांततेत वावरणारे आपण बहिरे होतो...आंधळेही... आणि अधूही.
गाळणी बसते, चाळत राहते. छळत राहते.
निषेध करतो. त्रिवार करतो. हॅशटॅगतो. बघतो. सवयीचे होतो. बोथटतो. जगतो...मरत मरत.

लिहायला घेते मनातल्या मनात असं बरंच काही. पण बऱ्याचदा भेटत राहतात माणसं. माणसांची बनलेली. मग शब्दांच्या माणसी रचनेला महत्व उरत नाही. घुसमटतात मग ही माणसाळलेली अक्षरे आणि हे शब्द जे भाषांच्या मर्यादेत अडकत राहतात. ज्यांच्या अर्थातल्या संकल्पनांना एकवेळ नसेल मर्यादा पण उच्चाराला अर्थ लगडतो एखाद्या सीमित भाषाविश्वाचा. मग ते मराठी होतं, इंग्लिश ,कन्नडा, तेलगू किंवा हिंग्लिश होतं. त्यांच्या शुद्धाशुद्धतेच्या कसोट्या लागतात डोकं वर काढायला. ती छाटणारेही असतात आजूबाजूला...
कधी सशस्त्र कधी निशस्त्र.
कधी बोलघेवडे,कधी न बोलून शहाणे.

लिहिणं जगणं असतं काहींचं.
काहींचं जगणं लिहिण्यात उतरतं.
बंद मुठीत वाळू घ्यावी, मग ती निसटून जावी त्या बंदिस्ततेतून. हाताला चिकटलेली वाळू तेवढी खुण असते त्या अनुभवाची. तसंच होतं.
लिहायला घेते मनातल्या मनात बऱ्याचदा पण हाताशी तेच राहतं जे अनायसे राहिलं हाताशी.
जे हवं हवं म्हणून ध्यास धरला ते त्याच हव्यासापोटी निसटून जात राहतं. त्याच्या सुटकेचा क्षण दिसत राहतो पण पकडता येत नाही... वाळूला हातात, 'त्या'साऱ्याला शब्दांत.

लिहायला घेते मी मनातल्या मनात बऱ्याचदा...
भरकटत राहतं मग असं इतर सगळंच;
#त्या_आशयाभोवती.



-प्राजक्ता.