Friday 30 September 2016

Independent लडकी....पिंकच्या निमित्ताने!

"Independent लडकी लडकों को confuse कर देती है।"
वाक्य अर्थातच सध्या चर्चेत असणाऱ्या चित्रपटातलं. #PINK मधलं.
चित्रपट पाहिल्यापासून वाक्य डोक्यात घुमतंय.
मागच्या पिढीचा अनुभव काय असेल सांगता येणार नाही, मात्र हे वाक्य माझ्या पिढीतल्या अनेक मुलामुलींना/ स्त्री पुरुषांना लागू आहे. 
हे वाक्य जर-
Independent लडकी को देख के [dependent] लडके confuse हो जाते है। असं असतं तर आणखी आवडलं असतं. असो.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात...
-ज्यांना निव्वळ 'घराला घरपण' देणारी बायको हवी असते. अर्थात या घरपणात भावनिक आधार किंवा मानसिक शांती हा फार खचितच मुद्दा येतो.
यांच्या लेखी घरपण म्हणजे-
कामावरून आल्यावर 'ती' स्वतः कामाला जात असली आणि दमली वगैरे असली,तरी नवऱ्यावरचं 'प्रेम(?)' दाखवण्यासाठी पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देते.
चार चौघात का होईना 'अहो' म्हणते.
'यांना विचारून सांगते'ची जागा हल्ली 'याच्याशी बोलून कळवते' ने घेतलेली असते. अर्थात यातही काही गैर नाही...जर हे एकमेकांशी सल्लामसलत करणं अन्योन्य (रेसिप्रोकल) असलं तर...आणि तरंच!

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात-
जे अभिमानाने सांगतात मला माझी आई/ताई/आजी/आत्या/मामी/काकी/ घरातली कोणतीही स्त्री साधं माझं जेवणाचं ताटही उचलू देत नाहीत. आमच्यात तशी पद्धतच नाही.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात- जे गरम पाण्याच्या बादलीमध्ये उभी राहून चपात्या करणाऱ्या आपल्या आईचा फोटो फेसबुकवर अपलोड करतात हे म्हणत - कि बघा खऱ्या आईचं प्रेम!! इतकं आजारी असून, पाय दुखत असूनपण,मुलाला गरम चपात्या खायला मिळाव्यात म्हणून माझी आई अशा परिस्थितीत पण चपात्या करते आहे!!!
हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात ज्यांना एरवी सोडा पण आई आजारी असतानाही साधी स्वतःची जेवणाची सोय करता येत नाही.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात ज्यांना वाटतं की ते पैसे कमवतात त्यामुळे ते स्वतंत्रवृत्तीचे आहेत पण आधी आई - मग बायको - मग सुनेवर  जेवण-खाणं-आंघोळीला जाताना टॉवेल देण्यापासून ते घरातला केर काढण्यापर्यंत डीपेंड राहत स्वतःची उष्टी स्वतंत्रता मिरवत राहतात.
आणि त्याउपर-
स्त्री जन्म हा आधी पिता - मग बंधू -आणि मग पुत्रावर विसंबून असतो अशा भाकडकथाही पसरवत राहतात.
व्यक्तिगत आयुष्यात पित्याच्या आणि बंधुच्या प्रचंड आधाराचा मला अनुभव आहे, पण त्या आधाराच्या कधी बेडया झाल्या नाहीत...तरीही हे असं बेगडी आधाराच्या नावावर राणीच्या बागेतल्या प्राण्यासारखं बाईला बंदिस्त करून ठेवलं जातं हा सार्वत्रिक अनुभव मला नाकारता येत नाही.

तथाकथित इंडिपेंडंट आयुष्य जगणाऱ्या पुरुषाला बाईच्या स्वातंत्र्याविषयी भूमिका घेताना राजदूतांच्या तोडीस तोड असं डिप्लोमॅटिक होताना पाहिलं आहे...
मग यात अनेक तर्क-वितर्क मांडले जातात-
>कुटुंबाचं स्थैर्य महत्वाचं
>बाहेर वातावरण कसलं आहे तुला जाणीव नाहीए
>गरजंच काय आहे?
>मुलांवर चांगले संस्कार व्हायचे असतील तर आईच लागते!
>एखाद-दुसऱ्या टक्के पोरींवर रेप होतात, तुम्ही काय त्याचा एवढा issue करता कळत नाही!

यादी तुम्हालाही वाढवता येऊ शकते.

मुद्दा हा आहे की पिंक मधलं हे वाक्य-
"Independent लडकी लडकों को confuse कर देती है।" चित्रपटातील संदर्भाच्यापलीकडेही लागू होतं.

Confuse होऊन तुमच्यातला पुरुष चित्रपटात दाखवल्याप्रमाणे शारीरिक बलात्कार करेलच असे नाही. पण या अशा पुरुषांच्या confuse मानसिकतेने अनेकींवर मानसिक जोरजबरदस्ती केलेली असते याची जाणीवही या कान्फ्युज्यांना नसते किंवा सोयीने ती दडपली जात असते.

स्वतः कमवणाऱ्या, स्वतःचे निर्णय घेणाऱ्या, एकट्या राहणाऱ्या, एकट्या हिंडणाऱ्या/फिरणाऱ्या किंवा स्वतःच्या निवडीनुसार माणसांची संगत करणाऱ्या अनेक स्वतंत्रवृत्तीच्या स्त्रियांची लग्न होताना किंवा झाल्यावर या स्वातंत्र्याविषयी अनेक तडजोडी कराव्या लागणाऱ्या स्त्रिया पाहिल्या आहेत. 

तेव्हा हाच विचार येतो.
'मुलीला स्वतंत्र बनायला इतकं सारं करावं लागतं.
मुलगा फक्त कमवता झाला की स्वतंत्र होतो.'
ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमचे अनेक १५ ऑगस्ट येतील नि जातील पण त्यात आम्ही झेंडा हा फक्त प्रतीक म्हणूनच फडकवत असू हे लक्षात असू द्या. चित्रपटात हे सगळं कुठे आहे विचाराल नाही का? चित्रपटाने यातलं काहीच थेट म्हंटलेलं नाही. पण चित्रपटातील समाज हा याच डिपेंडेन्ट आणि तरीही स्वतःला सत्ता स्थानी मानणाऱ्या  पुरुषसत्ताक मानसिकतेचा बनलेला आहे. जो अधोरेखित केला नसला तरी ...तो आहे. 

नाही. नकार. हे संपूर्ण वाक्य आहे हे समजण्यासाठी 2016 मध्ये एक अक्खा चित्रपट बनवावा लागतो. तो लोकांच्या गळी उतरावा म्हणून हिंदी चित्रपटांच्या शहेनशहाची त्यात भूमिका असावी लागते, आपल्या समाजासाठी यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही. 'मॅरिटल रेप्सना आपल्या सांस्कृतिक विश्वात जागा नाही'(!!!) असे विधान एक महिला मंत्री करतात तेव्हा समानुभूती(emapthy) या शब्दवरचा विश्वास उडून जातो.  मुळात बलात्कार हा निव्वळ पुरुषसत्ताक मानसिकतेचा परिपाक आहे हेच मानायला आपण अजून तयार नाही. आपल्यातल्या अजून कित्येकांना वाटतं की महिला, मुली, लहान बाळं ,वृद्ध स्त्रिया यांच्या कपड्यांमुळे किंवा त्यांच्या एकूण वागण्या बोलण्यातल्या 'हिंट्स' मुळेच बलात्कार होतात. या हिंट्स वरही चित्रपटात भाष्य केलेच आहे. Men will be Men, लडके है लडको जैसेही बरताव करेंगे अशी निलाजरी वक्तव्य आपण करत जातो. तथाकथित अपुऱ्या कपड्यांमुळे बाई पुरुषाचे लक्ष वेधून घेते आणि बलात्काराला स्वतःहून आमंत्रण देते असे म्हणणाऱ्यांना मला विचारावे वाटते की आजूबाजूला पहा, अनेक उघडे पुरुष पाहायला मिळतील, भर रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला लघवी करत उभे राहिलेले दिसतील, रस्त्यात कपडे बदलताना दिसतील, इतकंच काय एकट्या बाईकडे बघून दिवसा ढवळ्या मास्टूरबेट करताना दिसतील...या सगळ्यांवर स्त्रियांकडून शारीरिक अथवा मानसिक जोर जबरदस्ती होताना का दिसत नाही??? (टेस्टेस्टेरॉन सारखी पाचकळ उत्तरे देऊ नका. नाहीतर कधीच उल्लेख न केल्या जाणाऱ्या महिलांच्या orgasm विषयी चर्चेला तुम्हाला मी भाग पाडेन.)आणि पुढे हा विचार करा की  विधवा स्त्रीला कुरूप करण्याचा घाट का घातला जात असावा? सतीच्या मागे खरंच किती काळजी होती? आणि जगप्रसिद्ध प्रश्न एका परिटाच्या सांगण्यावरून रामाने सीतेची चारित्र्य परीक्षा घेतलीच ना? हे सगळं स्त्रीला असणारं लैंगिक स्वातंत्र्याला नाकारणं आहे.
इंडिपेंडंट मुलींचे Character assassination अर्थात चारित्र्य हनन हा आणखी एक महत्वाचा मुद्दा पिंकने अधोरेखित केला आहे. लोक काय म्हणतील या मानसिकतेचा जाच मुलांना फक्त शिक्षण/जॉब/व्यसन/पालकांची सेवा इत्यादी बाबतच सहन करावा लागतो. मुलींना हे तर सगळं सहन कराव लागतंच पण त्याच बरोबर एखाद्या मित्रासोबत किंवा अनोळखी मुलासोबत सोसायटी बाहेर/ बिल्डिंग खाली, घराच्या आत किंवा बाहेर/ फेसबुक वरील ओपन प्लॅटफॉर्म्स वर किंवा व्हाट्सअप ग्रुपवरही कुठेही नुसतं मनमोकळं बोलताना याचा विचार करत बोलावं लागत कि लोक काय म्हणतील? किंवा मी नुसत्या मैत्रीच्या नात्याने बोलते आहे हे समोरच्या व्यक्तीला नाही समजलं तर? तर मग काय? त्यापेक्षा जाऊदे. अस म्हणत बऱ्याच जणी मोकळंढाकळं वागणं टाळतात. आणि मग आपण बोलत राहतो ती बुजरी आहे, पोरींना चारचौघात आत्मविश्वासाने बोलता येत नाही.
माशाला पाण्याबाहेर ठेवायच आणि म्हणायचं कि अरे हे तर पोहोतच नाही,अशातली ही गत.

चित्रपटाच्या यशा नंतर आणखी एक मतप्रवाह डोकं वर काढू लागला तो म्हणजे हा कि -बघा
काहीही झालं तरी शेवटी एक पुरुषच आला ना अबला स्त्रियांच्या संरक्षणा साठी!!! आता यावर अनेक स्त्रीवाद्यांचेही म्हणणे आहे की त्याऐवजी एक स्त्री पात्र असते तर जास्त प्रभावी संदेश गेला असता. परंतु माझं व्यक्तिगत मत असे आहे की त्या ठिकाणी एखादी स्त्री आहे अथवा पुरुष हा मुद्दाच गौण व्हावा अशा समाजाची स्वप्न आपल्याला पडायला हवीत. मुळात लढा हा पुरुषसत्ताक मानसिकतेविरोधात आहे, आणि तो मातृसत्ता स्थापन करण्यासाठीचा नाही. हे लक्षात घेतलं कि खरा स्त्रीवाद कळतो. सत्ता ही कोणाचीच नसावी. प्रत्येक व्यक्ती समान पातळीवर असावी.  मग नुसता मानवतावाद का नको? स्त्रीवादाचा हट्ट का? तर साधी गोष्ट लक्षात घेऊया कि मानवतावादाला नकार नाही. तो असण्यास काही कारण नाही. पण पंचवार्षिक योजना बघा आधी Growth वर केंद्रित होत्या,मग पुढे Inclusive Growth वर आधारित झाल्या? अस का झालं? कारण आधीची वाढ ही सर्वसमावेशक नव्हती. ती सर्वसमावेशक व्हावी यासाठी दुबळ्या असणाऱ्या किंवा दुबळ्या ठेवल्या गेलेल्या घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना प्रस्थापितांच्या समान पातळीवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. तसेच हे. पुरुषसत्ताक मानसिकता ही निव्वळ पुरुषांमध्येच असते असे नाही. स्त्रियाही त्याच्या बळी आहेत. सक्षमीकरणाचे कार्यक्रम हे फक्त महिलांचे होता कामा नयेत. आधी कधीही न अनुभवलेली समानता अनुभवण्यासाठी स्त्री पुरुष दोघांनाही एकत्रितरित्या तयार करणे गरजेचे आहे. काहींच्या मते शिकलेल्या/कमावत्या मुलीला घरात लग्न करून आणले कि घरात भांडणं होतात. आता खरंतर ही भांडण होतात कारण आधुनिक विचारांची बायको हवी म्हणून उच्चशिक्षित मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांनाही हे लक्षात येत नाही कि तिची स्वप्नेही तितकी मोठी असणार, आधुनिक शिक्षण घेतलेल्या सुनेकडून त्याच त्या पूर्वापार चालत आलेल्या रांधा वाढा उष्टी काढा परंपरांच्या
अपेक्षा यांना असतात. पण दोष मात्र त्या पिढीतल्या मुलींना. जिथे अजून मानसिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वातंत्र्यही पुरेपूर स्त्रीला उपभोगता येत नाही तिथे तुम्ही लैंगिक स्वातंत्र्याचा उच्चार तरी कसा करणार? त्यामुळेच बाईकडून कोणत्याही प्रकारचा NO हा या समाजाला अपेक्षित नसतो. त्या पार्श्वभूमीवर पिंक महत्वाचा ठरवावा लागेल. हो 'ठरवावा लागेल' . पिंकपेक्षाही अधिक ठळक भाष्य करणारे चित्रपट यापूर्वीही होऊन गेले आहेत पण आपल्या समाजाची आकलनाची पातळी पाहाता अशा बडबडगीतांसारख्या सिनेमाची गरज आहेच. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उत्कृष्ट असला तरी जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर स्त्रीवादी चळवळ आणि लिंगभाव चर्चा (Gender Debate) बरीच पुढे गेली आहे.
पण पिंकच्या निमित्ताने म्हणावे वाटते...
हेही नसे थोडके!


-प्राजक्ता.

Friday 2 September 2016

प्रौ'ढं'!

पेस्ट्री आवडते? ... पेस्ट्रीच्या दुकानात कामही करता?...पण मग तुम्हाला पेस्ट्री खायला मिळते का नेहमी? नाही.
लहान मुलांमध्ये रमता?...लहान मुलांसोबत काम करता?... तर मग तुम्हाला लहान व्हायला मात्र मिळते...नेहमीच.

शाळेत असताना बालदिनाला "मुले ही देवाघरची फुले" "मुले हेच राष्ट्राचे खरे अलंकार!" "मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती" अशा अर्थाच्या घोषणा देत असू पण घाई होती मोठं होण्याची. मोठ्यांच्या चपला घालणं, घर-घर / ऑफिस ऑफिस खेळणं, शाळेतल्या बाई होणं... हे सारं त्याचाच भाग.
मोठं होता होता निबंधांमध्ये "लहानपण देगा देवा..."इत्यादी वाक्ये वापरत असलो तरी वाटत होतं की यात काय खरं नाही. मनासारखं वागायचं तर मोठं व्हावं.
दुसरा पर्याय नाही.
मग मोठं झालं की तर असतंच नॉस्टॅल्जिया प्रकरण.
आजकाल तर फेबूवर पोष्टी पण फिरत असतात फोटोज सकट... If you know this then your childhood was awesome आणि काय ना काय.

खरंतर काळ ही संकल्पना मुंबईच्या लोकलच्या जाळ्यासारखी हवी होती. जेव्हा वाटेल तेव्हा जिथून वाटेल तिथून उठायचं नि दादर/कुर्ला गाठून जिथे ज्या काळात जायचं तिथे सुटायचं!
मग स्टेशनंही बदलत राहतील. त्याच त्याच गाड्या नि तेच तेच प्लॅटफॉर्म असणार नाहीत.
त्याच त्या आठवणी असणार नाहीत.

जे जगालोच नाही ते अनुभवायचं कसं?
अशा बुचकाळ्यात पडताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी- स्वतःच्या बालपणात रमणे आणि बालपणात रमणे यात फरक आहे.
मी घराच्या पोटमाळ्यावरून खेळण्याची टोपली काढणं आणि त्यात रमणं हे माझं बालपण जगणं/स्मरणं झालं.
जवळच्या ओळखीच्या/अनोळखी मुलांमध्ये रमणं हे 'निव्वळ बालपण' जगणं झालं.
ते जास्त मन मोहणारे आहे असाच आत्तापर्यंतचा अनुभव आहे.

लहानग्यांशी बोलण्यापेक्षा त्यांचं जितकं ऐकत जाऊ आपण तितकी अनेक वेगवेगळी लहानपणं जगत जातो आपण. अनुभवत जातो.
बालपणं स्थळ काळ सापेक्ष तर असतातच पण एकाच स्थळातील/काळातील बालपणही सतरंगी असतात. शिवाय या ऐकण्याच्या प्रक्रियेचा सर्वात जास्त आनंद घेतात ती ही लहान लेकरंच.
आपण मोठे असतो,पण तरी खास त्यांच्यासाठी आपलं लहान होणं...मुद्दाम पडणं/रडणं , तोंड वेडीवाकडी करणं  हे त्यांना समजत असतं. त्यांना त्याचं अप्रूप असतं.
हे अप्रूप वाटून घेणं जेव्हा तुमच्या दिनाक्रमाचा भाग असतो तेव्हा प्रत्येक क्षणाला तुमच्या बालपणांमध्ये नवनवी बालपणे मिसळत जातात. तुम्ही समृद्ध होता की नाही माहित नाही पण तुम्ही बालक होत राहता आणि ही बाल्यावस्थाच तुम्हाला चिकित्सक बनवते, जीवनाविषयी उत्सुक बनवते, लहान लहान गोष्टींमधला आनंद घ्यायला शिकवते.
नाहीतर कामावर रुजू झाल्यापासून रिटायर होण्यापर्यंतच्या काळात कसं सुरक्षित म्हातारं होता येईल याचंच नियोजन करत राहतो आपण सगळेच प्रौ'ढं'.

-प्राजक्ता.