Wednesday 8 February 2017

पोकळीतून...

~१~
>>निव्वळ 'कष्ट' करण्यातच मेहनत असते या गोष्टीवरचा विश्वास उडालाय आता. आराम-लादलेला आराम किंवा आळसही निभावून नेणे फार कष्टाचेच. पार थकून जातो आपण. दिवसाअखेरीस अंग दुखून निघतं. शिवाय झोपेचेही तीन-तेराच वाजतात! कष्ट-बिष्ट केल्यावर म्हणे पडल्या-पडल्या झोप लागते.
तेही इथे नाही.
यादरम्यान "दिनक्रम वगैरे नसतो" किंवा "एकदमच ढिसाळ  कार्यक्रम असतो" म्हणाल तर शुद्धिवर या!! कार्यक्रम अगदी चोख ठरल्याप्रमाणे पार पडतो; शरीर-मनाचं आंबत जाणं...विनाव्यत्यय.<<


~२~
"कित्तीsss" बोलतो आपण!
आपण सगळेच. शेकडोने असणाऱ्या बातम्यांच्या वाहिन्यांचे पत्रकार, माइक हातातून खाली ठेवतच नसावेत बहुधा. ऑलिंपिकच्या मशालीसारखे एकमेकांकडे सोपवत असावेत ते!
"यावर तुम्हाला काय वाटतं?" "तरी तुमचं मत,अंदाज काय?"...माणसं विचारत असतात,
माणसं उत्तरं देत असतात.
विचार कोण करतं आणि ऐकतं कोण?
याचा शोध चालू आहे.
टाचणी मारल्यावर भळाभळ रक्त येऊ लागावं तशी व्यक्त व्हायला- नव्हे- खरंतर नुसती बोलायला संधी शोधत असतो आपण. नाटक,चित्रपट,मालिका यातली स्वगतंही मोठमोठाल्या आवाजातच हवीत आपल्याला!
3मिनट्स पॉपकॉर्न्स सारखंच;
वाटलं काही- टाक बोलून- वाटलं काही- टाक बोलून
अशी शीघ्र प्रतिक्रियावादी जनता कधी झालो आपण कळलंच नाही! 'आज'च्या  घटना/दुर्घटनेवर कोणी दोन दिवसांनी संयमित विचार करून sms करून पहावा इतरांना किंवा सोशल मिडियावर शेअरुन पाहावे इतक्याsss 'उशिरा'...'अश्मयुगीन' म्हणून शिक्का बसेल तो कायमचाच. म्हणून मग त्या भावनांची तिव्रताही अशी पॉपकॉर्नसारखी तुडतुडीत आणि हलकी. "दोन सेकंदही मागे येऊन पाहणे;म्हणजे काळाच्या मागे पडणे" असं वाटणारा हा काळ!

ता.क. - 'काळा'च्या पुढचा विचार करायला हल्ली 'वेळ' कुणाकडेच नाही.

~३~
कागदाचा शोध कधी लागला माणसांना?
आणि नात्यांचा??
या दोघांची सरमिसळ कधी झाली? का  झाली?
माणसाच्या असण्या-नसण्याचा कागदाशी काय संबंध? पिकलेले केस, वाकलेली कंबर यापेक्षा पासष्टी उलटली हे कागदावर छापील असेल तरच खरं.
एक कागद - एक सही आणि तुम्ही एकमेकांचे "आहात" चे "होतात" होता.
माझ्या असण्याचा पुरावा -कागद.
I think therefore I exist...वगैरे सगळं फूलीश.
'कागद' दाखव नाहीतर स्वतःचेच श्राद्ध घाल. श्राद्धानंतर, भटाला दक्षिणा म्हणून द्याव्या लागणार्‍या नोटाही कागदच!
अर्थात हा कागद अभिजन (Elite);
'सगळ्या जीवनावश्यक कागदां'ची सोय करू शकणारा!

~४~

विचारांची जुळवाजुळव जमेनाशी झाली की
आपण वस्तूंची जुळवाजुळव करायला घेतो.
म्हणजे पुस्तके आवरणे,कपडे घडी करणे इत्यादि इत्यादि.
किमान काहीतरी आपल्याला ठरवल्यासारखं व्यवस्थित रचता येतंय याचच काय ते समाधान...

~५~

एखादी जखम सुकली का ? भरली का हे पाहायला त्यावरची खपली दुखत असतानाही काढायाची आणि मग भळभळ वाहणाऱ्या जखमेने तिचं भरून न आलेलं अस्तित्व दाखवून दिलं की हळहळायचं,औषध शोधत फिरायचं...
विचारांचही तसंच.
जे विचार दडपायचेत त्यांना आपणच कटघर्यात उभं करायचं. फिर्यादी वकील आणि न्यायाधीशही आपणच. मग कितीतरी काळ आपण खटला चालू ठेवणार. आरोपी म्हणून का होईना पण ज्यांना नाकारायचंय त्या विचारांना मनोपटलावर एक अढळ जागा देणार!
'बरं' तसंही वाटत नाही अन् असंही...



-प्राजक्ता
#पोकळीतून

तळटिप:: कोणत्याही प्रकारच्या राजकीय आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक,कौटुंबिक,नैतिक वा अनैतिक किंवा नातेसंबंधाच्या वगैरे सत्तेची सूत्रे वा खुद्द सत्ता वा तिची शक्यता असे काही म्हणजे काहीच हातात नसताना... स्वतःची जागा, त्या त्या जागेचे व्यवस्थांमधील स्थान किंवा संपूर्ण व्यवस्थाच;यांमधे असूनही नसताना अनुभवास येणाऱ्या #पोकळीतून केलेले हे लिखाण !
(साधारण ४-५ वर्षांपूर्वीचे लिखाण असल्याने काही संदर्भ जुने येतील)

Wednesday 1 February 2017

'ती'चे जगणे...१

वाचायला सुरुवात केलीच आहे आपण तर याचा अर्थ 'ती' अर्थात कोणतीही स्त्री, मग ती तुमची माँ-बेहेन असो वा नसो,तीच्या जगण्याविषयी खुलेपणाने जाणून घ्यायला आपण तयार आहोत; या गृहितकाच्या आधारे आपला संवाद होत राहील हे आधीच मान्य करून घेऊ. तिच्या जगण्याचे इतके अनेक पैलू असताना नेमका कोणता मुद्दा आधी मांडला जाईल?

"स्त्री हक्क जाणीव ? हुंडा? सरपंच-पती? नेहमीचीच झालेली छेडखानी/अश्लील चाळे व स्पर्श? बलात्कार? सिनेमातील तिच्या जगण्याचे एकांगी दर्शन? अगदी डबल ग्रॅड असूनही सासरच्यांना पटत नाही म्हणून नोकरी न करणं? उद्दातिकरणाने ग्रासलेले मातृत्व? अवकाशात यात्रा करूनही पृथ्वीवरच्या लक्ष्मणरेषांनी घेरणं? क्रीडा क्षेत्रात टॉपला जाऊनही तिच्या स्कर्टची चर्चा होणं? तिला नकाराचा अधिकार आहे हे समजवण्यासाठी 2016 मध्ये अक्खा चित्रपट तयार करायला लागणं? आरक्षित जागा दिल्या म्हणून तिच्यासारख्यांना तुच्छेतेने बघणं आणि जागा न मिळाल्याने गर्दीत उभ्या बाईला शक्य तिथनं चाचपणं! शिकून सवरून समर्थ झालेल्या स्त्रियांना स्त्री चळवळ/स्त्रीवाद यांच्या आपल्या आयुष्यातील योगदानाचा विसर पडणं? स्त्रीवाद म्हणजे निव्वळ पुरुष द्वेष नाही हेच समाजाला समजवण्यात स्त्रीवाद खर्ची होणं? की कोणत्याही स्त्री वर कुठेही कसाही हल्ला झाला कि #not_all_men च्या टॅगाखाली चर्चेचा मुद्दा भरकटवणं?...."

कि याही पलीकडे अजून काही!!!

नेमकं कशावर बोलायचं या जागेत?

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील एक भिंत किंवा त्यावरील एखादा कोपरा म्हणाना! त्याचा सुदुपयोग नेमका कोणत्या एका मुद्द्यासाठी करायचा?

मुळात स्त्रीत्व मग ते आजचं असो वा कालचं हे या साऱ्या आणि यासारख्या अनेक पैलूंचं एकात्मिक (इंटीग्रेटेड) रूप आहे.

'ती'चं जगणंच काय तर मरणंही आपण या सगळ्यांतून वेगळं काढू शकत नाही. तुकड्यात पाहायचे म्हणाल तर एकतर फसाल तरी, नाहीतर फसवाल तरी.

'ती'चं जगणं समजून घ्यायचं असेल तर ते जुनाट पूर्वापार चालत आलेल्या कन्येच्या'दाना'च्या परंपरेपासून ते काल आता झालेल्या निश्चलीकरणात अडकून पडलेल्या ताई माई आत्या आई आजी काकी मामीच्या बाजूला/पितळेच्या डब्यात किंवा कपटातल्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या पैशाच्या प्रश्नापर्यंत सगळंच समजून घ्यावं लागेल. आजची स्त्री ही काही डायरेक्ट आभाळातून पडलेली नाही. तिच्यात, तिच्यावर, तिच्या आसपास अजूनही जुनाट बेड्या आहेत नाहीतर नवी सेफ्टी लॉक्स तरी! कधी दृश्य कधी अदृश्य. कधी तिच्या जाणतेपणात कधी तिच्याही अजाणतेपणात. कधीकधी तीने त्याकडे केलेल्या काणाडोळ्यात ती बंधने अजूनही रुतून आहेत.

जिथे बेड्या नाहीत तिथे त्यांचे व्रण आहेतच. स्वातंत्र्याची किमंत तिला चुकवावी लागतेच हे पटवून देणाऱ्या त्यांच्या तन-मन आणि चारित्र्यावरच्या खुणा या. आपल्या आसपासच्या त्या जरा आगाऊच/कमावते म्हणून स्वतःला शहाणी समजणाऱ्या/नवरा जिच्या ताटाखालचं मांजर आहे/ इतकी शिकली म्हणजे काय संसार करू शकणार नाही,हिला नवरा मिळणं कठीण आहे असं आणि या प्रकारच बरंच काही आपण ज्यांच्याबद्दल विचार करतो त्या आपल्याच आसपासच्या बायकांच्या जागी तुमच्याच ओळखीचे अथवा अनोळखी कोणीही पुरुष आहेत अशी थोडावेळ कल्पना करा. मग जी बाई आगाऊ वाटली असेल त्याजागेवरचा पुरुष बेधडक वाटेल, कमावणाऱ्या त्या जागेवर पुरुष असेल तर त्याने स्वतःला शहाणं का समजू नये? असा प्रतिप्रश्न काहीजण करतील. बायको नवऱ्याच्या ताटाखालंच मांजर असणं तर गृहितकच! कित्ती शिकलाय हा मुलगा!!याच्याशी लग्न होणारी मुलगी भाग्यवानच असणार बघा! असंही आपण म्हणू. ही कल्पना प्रामाणीक मनाने स्विकाराल तर कळेल "कुठे आहे आता स्त्री पुरुष भेद?" "जुन्या बायकांसारखं थोडीच काही त्रास आहे या आजच्या पिढ्यांना?" हे असले राग आपण आळवत बसणार नाही.

मुलाला बापाची चप्पल व्हायला लागली की बापाने मुलाशी मित्रासारखं वागावं म्हणतात. पण एखादी (त्याच वयाची समजा हवंतर) मुलगी आपली मते ठाम पण मांडू लागली की मग आपण म्हणणार- "चार बुका शिकली तर हिला शिंगे फुटली आता ! आमच्यावेळी नव्हतं बाबा/बाई असं." वगैरे वगैरे.

हे भेद आपल्या समाजात तुमच्या माझ्यात अजूनही आहेत हे मान्य करणं म्हणजे नाजूक भागाचं दुखणं करून ठेवलं आहे आपण. एकतर ते मान्य करायला वेळ घेतो. कसे का होईना पण मान्य केले तर मग त्याला लपवण्यावर,संस्कृतीच्या नावावर ते दडवण्यावर जोर देतो. मग आपण एकतर या बाया पुरुषांची जागा घ्यायला आल्यात असा आकांडतांडव तरी करतो किंवा त्यातूनही जर सद्सदविवेकबुद्धी जागरूक झाली तर प्रामाणिकपणे आपल्यातल्या चुकांच्या दुरुस्तीचा मार्ग स्वीकारतो.

निवड तुमची आहेच. पण त्या निवडीच्या तुमच्या निर्णयावर भविष्यातील भेदरहित समाजाची जडण घडण होणार की नाही हेही अवलंबून आहे. आपल्यावरची जबाबदारी ओळखून घेऊन तिचं जगणं समजावून घेऊया. लढा हा पुरुषाशी नाही. तर माझ्या आणि तुमच्यातल्या पुरुषसत्ताक मानसिकतेशी आहे हे लक्षात ठेवूया.


कुसुमाग्रजांनी देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिलेल्या 'फटक्यात' म्हंटले होते;

"समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका।

दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।"

इतक्या सामान्य शब्दात मांडलेले तत्वही आपल्यासारख्या अतिसामान्यांना आचरणात सोडा पण अजून विचारातही पूर्णतः उतरवता आलेले नाही.

अजूनही आम्ही स्त्रियांवरील अत्याचारांविषयी चर्चा करताना आम्ही कसे स्त्रीला मातेसमान मानतो,देवी म्हणून तिचा गौरव करतो आणि काय काय उदात्त हेतू त्यांच्याविषयी बाळगतो याचे नगारे पिटत राहतो! निव्वळ एक व्यक्ती म्हणून तिचा स्वीकार न केल्याने तिने केलेल्या सामान्य चुकाही मग संस्कृतीवर हल्ला म्हणवून घेतो. ज्या इंग्रजी/युरोपियन विचारधारांच्या परिचयामुळे भारतीय बुद्धिजीवी वर्गाला देशाच्या पारतंत्र्याविरोधात लढण्यासाठी प्रेरित केले त्याच किंवा तत्सम विचारांच्या प्रभावाखाली, जागतिक चळवळींच्या आधारे जेव्हा देशातील स्त्री आपल्या स्त्रीत्वाच्या पारंपरिक बेड्यांविरोधात उभी राहते तेव्हा मग 'हा सगळा पाश्चात्य संस्कृतीचा अनिष्ट परिणाम' असल्याचं आपण म्हणू लागतो. बरं परदेशात कोणत्याही स्त्रीवादी चळवळी झाल्या असल्या तरी 'स्त्री-पुरुष समानता' हा जगप्रसिद्ध ग्रंथ ताराबाईंनी भारतातच लिहिला! निव्वळ स्त्रीशिक्षणाचाच नाही तर दलितातील दलित असणाऱ्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या फातिमा शेख याही (आता विश्वास ठेवायला कठीण जाईल पण ) पुरोगामी म्हंटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच होऊन गेल्या. त्यामुळे उठसूट पश्चिमेकडे बोटे दाखवणारे लोक अनायासे स्वसंस्कृतीलाच कमी लेखत असतात हे त्यांनाही कळत नाही. कळून घ्यायचेही नसते म्हणा. कारण ताराबाई शिंदे सहज विस्मरणात घालवता येतात आणि फुले दाम्पत्याला त्यांनी मुलींसाठी अमुक साली अमुक ठिकाणी शाळा उघडली, अमुक गल्लीतून जाताना शेणाचे गोळे खाल्ले असे तुटक तुटक सोयीचे उदात्तीकरणाचे खेळ खेळता येतील इतके तुकडे लोकांच्या तोंडावर टाकत राहिले कि मग बदलाची शक्यता नाकारताही येते आणि पुरोगामीत्वाचा मुखवटा मिरावताही येतो.

जाहिरातबाजी जबरदस्त जमली की मग तत्वांच्या अंमलबजावणीकडे कोणी बारीक लक्ष तसेही देत नसते. एकदा फक्त गावाबाहेर पाटी लागली की हा गाव हगणदारी मुक्त आहे, दारुमुक्त आहे तर मग बाहेरून जाणाऱ्यांना वाटत राहते कि 'जमलं बुवा यांना!'आणि आतल्यांना घाण दिसत जरी असेल किंवा दारूच्या भट्ट्या दिसत जरी असतील तर ते एकतर या कारणासाठी गप्प राहतात कि त्यांना वाटत राहतं कि या एखाद दुसऱ्याच घटना आहेत किंवा या कारणासाठी गप्प राहतात कि जाऊदे ना उगा याची वाच्यता करून गावाची बदनामी कशाला?

पण त्यामुळे प्रश्न सुटलेला नसतो.

तर प्रश्न सोडवायचा असेल तर त्याचं असणं हे प्रथम स्वीकारावं लागतं. एकदा ते स्वीकारलं कि मग त्याबद्दलचा न्यूनगंड न बाळगता त्यावर उपाय योजना शोधावी लागते. ती शोधून राबावल्यावरही बराच काळ त्याचा पाठपुरावा करावा लागतो. कोणताही सामाजिक प्रश्न हा जसा एका रात्रीत सुटत नाही तसाच तो कायमचाही नष्ट होणे शक्य नाही. तो आपली रूपे बदलून डोके वर काढत राहणार! पण म्हणून त्याला नाकारून तो आपणच दूर होईल असे मानणे बाळबोध होईल फारच.


तर,एकुणात असे आहे की उद्याच्या पिढीतील बदलत्या काळात वाढणाऱ्या  मुलींना तसेच मुलांनाही भविष्य सुसह्य करून ठेवायचे असेल तर आजपर्यंतच्या 'ती'चा प्रवास , त्याची गती आणि दिशा या सगळ्याशी आपली ओळख होणे सर्वांच्याच हिताचे आहे. हा प्रवास कोणी आपल्या बोटाला धरूनच घडवून आणावा असे नाही. तो तुमचा तुमचा तुमच्या घरापासून, कुटुंबातील स्त्रियांपासून, शेजारणी/आसपासच्या महिला/ चित्रापाटातील काम करणाऱ्या नायिका ते विविध कंपन्यांच्या संचालिकांपर्यंत कोणाचाही प्रवास एक व्यक्ती म्हणून आपण पाहू लागलो कि आपलाही समानुभूतीच्या मार्गे एक नवा प्रवास नक्की सुरु होईल. त्यासाठी शुभेच्छा कायमच आहेत. :)

-प्राजक्ता.

तळटीप :
सदरहू लेख हा नवाकाळ या वृत्तपत्रात दिनांक २९जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे.