Wednesday 8 February 2017

पोकळीतून...

~१~
>>निव्वळ 'कष्ट' करण्यातच मेहनत असते या गोष्टीवरचा विश्वास उडालाय आता. आराम-लादलेला आराम किंवा आळसही निभावून नेणे फार कष्टाचेच. पार थकून जातो आपण. दिवसाअखेरीस अंग दुखून निघतं. शिवाय झोपेचेही तीन-तेराच वाजतात! कष्ट-बिष्ट केल्यावर म्हणे पडल्या-पडल्या झोप लागते.
तेही इथे नाही.
यादरम्यान "दिनक्रम वगैरे नसतो" किंवा "एकदमच ढिसाळ  कार्यक्रम असतो" म्हणाल तर शुद्धिवर या!! कार्यक्रम अगदी चोख ठरल्याप्रमाणे पार पडतो; शरीर-मनाचं आंबत जाणं...विनाव्यत्यय.<<


~२~
"कित्तीsss" बोलतो आपण!
आपण सगळेच. शेकडोने असणाऱ्या बातम्यांच्या वाहिन्यांचे पत्रकार, माइक हातातून खाली ठेवतच नसावेत बहुधा. ऑलिंपिकच्या मशालीसारखे एकमेकांकडे सोपवत असावेत ते!
"यावर तुम्हाला काय वाटतं?" "तरी तुमचं मत,अंदाज काय?"...माणसं विचारत असतात,
माणसं उत्तरं देत असतात.
विचार कोण करतं आणि ऐकतं कोण?
याचा शोध चालू आहे.
टाचणी मारल्यावर भळाभळ रक्त येऊ लागावं तशी व्यक्त व्हायला- नव्हे- खरंतर नुसती बोलायला संधी शोधत असतो आपण. नाटक,चित्रपट,मालिका यातली स्वगतंही मोठमोठाल्या आवाजातच हवीत आपल्याला!
3मिनट्स पॉपकॉर्न्स सारखंच;
वाटलं काही- टाक बोलून- वाटलं काही- टाक बोलून
अशी शीघ्र प्रतिक्रियावादी जनता कधी झालो आपण कळलंच नाही! 'आज'च्या  घटना/दुर्घटनेवर कोणी दोन दिवसांनी संयमित विचार करून sms करून पहावा इतरांना किंवा सोशल मिडियावर शेअरुन पाहावे इतक्याsss 'उशिरा'...'अश्मयुगीन' म्हणून शिक्का बसेल तो कायमचाच. म्हणून मग त्या भावनांची तिव्रताही अशी पॉपकॉर्नसारखी तुडतुडीत आणि हलकी. "दोन सेकंदही मागे येऊन पाहणे;म्हणजे काळाच्या मागे पडणे" असं वाटणारा हा काळ!

ता.क. - 'काळा'च्या पुढचा विचार करायला हल्ली 'वेळ' कुणाकडेच नाही.

~३~
कागदाचा शोध कधी लागला माणसांना?
आणि नात्यांचा??
या दोघांची सरमिसळ कधी झाली? का  झाली?
माणसाच्या असण्या-नसण्याचा कागदाशी काय संबंध? पिकलेले केस, वाकलेली कंबर यापेक्षा पासष्टी उलटली हे कागदावर छापील असेल तरच खरं.
एक कागद - एक सही आणि तुम्ही एकमेकांचे "आहात" चे "होतात" होता.
माझ्या असण्याचा पुरावा -कागद.
I think therefore I exist...वगैरे सगळं फूलीश.
'कागद' दाखव नाहीतर स्वतःचेच श्राद्ध घाल. श्राद्धानंतर, भटाला दक्षिणा म्हणून द्याव्या लागणार्‍या नोटाही कागदच!
अर्थात हा कागद अभिजन (Elite);
'सगळ्या जीवनावश्यक कागदां'ची सोय करू शकणारा!

~४~

विचारांची जुळवाजुळव जमेनाशी झाली की
आपण वस्तूंची जुळवाजुळव करायला घेतो.
म्हणजे पुस्तके आवरणे,कपडे घडी करणे इत्यादि इत्यादि.
किमान काहीतरी आपल्याला ठरवल्यासारखं व्यवस्थित रचता येतंय याचच काय ते समाधान...

~५~

एखादी जखम सुकली का ? भरली का हे पाहायला त्यावरची खपली दुखत असतानाही काढायाची आणि मग भळभळ वाहणाऱ्या जखमेने तिचं भरून न आलेलं अस्तित्व दाखवून दिलं की हळहळायचं,औषध शोधत फिरायचं...
विचारांचही तसंच.
जे विचार दडपायचेत त्यांना आपणच कटघर्यात उभं करायचं. फिर्यादी वकील आणि न्यायाधीशही आपणच. मग कितीतरी काळ आपण खटला चालू ठेवणार. आरोपी म्हणून का होईना पण ज्यांना नाकारायचंय त्या विचारांना मनोपटलावर एक अढळ जागा देणार!
'बरं' तसंही वाटत नाही अन् असंही...



-प्राजक्ता
#पोकळीतून

तळटिप:: कोणत्याही प्रकारच्या राजकीय आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक,कौटुंबिक,नैतिक वा अनैतिक किंवा नातेसंबंधाच्या वगैरे सत्तेची सूत्रे वा खुद्द सत्ता वा तिची शक्यता असे काही म्हणजे काहीच हातात नसताना... स्वतःची जागा, त्या त्या जागेचे व्यवस्थांमधील स्थान किंवा संपूर्ण व्यवस्थाच;यांमधे असूनही नसताना अनुभवास येणाऱ्या #पोकळीतून केलेले हे लिखाण !
(साधारण ४-५ वर्षांपूर्वीचे लिखाण असल्याने काही संदर्भ जुने येतील)

No comments:

Post a Comment