Thursday 11 October 2018

#MeToo पेक्षा आजच्या समाजाचे आभार __/\__

एक स्त्री म्हणून या काळाचे आभार मानावे वाटतात.
माझ्यातल्या घडत गेलेल्या स्त्रीला जागा करून
देणाऱ्या समाजाचे म्हणजेच तुमचे आभार मानावे वाटतात.

'बाईच बाईची वैरी असते' हा परवचा श्री/अ वगैरे गिरवायच्या आधीपासून आत्मगत करत मोठ्या होत असताना सुद्धा प्रवासात आजूबाजूला एखादी तरी बाई असली तरी हायसं मानत बाया हिंडल्या,
बाथरूमला जाताना सुरक्षितता म्हणून बायकांच्या घोळक्यात जायला संधी शोधत राहिल्या,
बाई दिसत नाही तोपर्यंत जीव मुठीत घेऊन कामं करत राहिल्या...
पुरुषांच्या पंगतीतून उठवून लावू नये म्हणून 'बायका कशा नखरेल असतात' या पुरुषांच्या बोलण्यात हामी भरत आपल्या तोंडचा घास काढून घेतला जाणार नाही याची काळजी घेत राहिल्या...
भानामती झाल्यासारख्या म्हणत राहिल्या की भेदभाव होत नाही... नोकरी सांभाळून  घरंचं काम करत राहणं, आई बनणं , त्याग वगैरे करणं हेच बाईपण.

पण आधी ब्र उच्चारु न शकणाऱ्या बाया शिकल्या सवरल्या,
ज्या अक्षरं नाही शिकू शकल्या त्या लढणं शिकल्या...तगनं शिकल्या... बोलू लागल्या.
आता तुम्ही समाज म्हणून त्यांना झिडकारून लावत असलात, खोटारड्या ठरवत असलात, त्यांच्या नोकऱ्या त्यांचे जीव धोक्यात आणण्याच्या धमक्या देत असलात, सोशल मीडियावर गलिच्छ शिवीगाळ करून,ट्रोल करून, मानसिक हिंसा ते शारीरिक हिंसेपर्यंत अशा विविध मार्गाने जात त्यांचं तोंड दाबून गप्प करण्याच्या प्रयत्नात असलात तरी...
तरी मला एक स्त्री म्हणून या काळाचे पर्यायाने तुमचे आभार मानावे वाटतात.

आज मायबापाने नाही ऐकलं तर अनोळखी बाया किंवा बाप्ये आहेत कार्यकर्ते/अधिकारी/संस्था म्हणून बाईच्या हुंकाराला ओ देणारे...
आज एकेक बाई उभी राहतेय 'मी सुद्धा' म्हणत
ती एकटी नाही याची हमी देत इतर बायांना, मुलींना बोलण्यास प्रवृत्त करतेय.
हा, बऱ्याच जणांना वाटतंय तरी आता हे 'मी टु' चं नवं फॅड आलं आहे, फेमस व्हायला या बाया काहीही खोटे नाटे आरोप करतात ताकदवान पुरुषांवर असे म्हणताहेत पण-
"काय प्रकारची प्रसिद्धी मिळते या अशा बोलण्याने? ज्या बाया बोलताहेत त्यांच भविष्यात काय होतं? आणि ज्या पुरुषांविषयी बोलतात त्यांच्या भविष्यावर सोडा पण त्यांच्या वर्तमानावर कितपत परिणाम होतो??" असे प्रश्न विचारणारे वाढताहेत, आत्मपरीक्षण करणारे बोटावर मोजणारे का असेनात पण ते आपलं अस्तित्व टिकवून ठेवताहेत किंवा आपण असे म्हणूया की समाज म्हणून तुम्ही तशी संधी त्यांना देताहात...

आज फेसबुकने अनोळखी लोकांनी मला माझे कपडे/शरीर/फोटो यावर केलेल्या अश्लील मेसेजेस सतत दिसणार नाहीत याची काळजी घेतली आहे,मला जेव्हा ते पाहावे वाटतील तेव्हा मी पाहून त्यावर हसू शकते किंवा रिपोर्ट करू शकते... आज रस्त्यावरच्या माझ्यावर कमेंट करणाऱ्या मर्दांना मी काहीच करू शकत नसले तरी सोशल मीडियावर त्यांना ब्लॉक करू शकते... अगदीच म्हणायचं झालं तर आज माझ्या न्युज फीड वर माझ्याच माहितीतल्या एखाद्या व्यक्तीने कोणतेही असंवेदनशील वक्तव्य केल्यास त्यांना अनफॉलो करू शकते.
वास्तविक आयुष्यात व्हर्च्युअल सारखं लॉग इन आणि लॉग आऊट करणं सोप्पं नाहीच पण किमान १० वर्षे , १६ वर्षे गेल्यावर का होईना मला नाकारलं गेलेलं काम मिळू शकतं, माझ्या भीतीवर मी मात करून पुन्हा ब्र उच्चारू शकते...
यासाठी तुम्ही समाज म्हणून जो वर्तमानपत्रातला रकाना देताहात मिडियातली जी स्पेस देताहात, चहाच्या टपरीवर आम्हा बायकांना येड्यात काढण्यासाठी का होईना पण चर्चेतून तुमचा वेळ देताहात... घरात बसून बातम्या बघताना आपल्या घरातल्या बायकांच्या बाबतीत असे घडत असेल का? त्यांचं या बाबतचं खरंखुरं मत काय असेल हे विचारत नसाल पण किमान तो विचार पूर्णतः झिडकरण्यापूर्वी एका सेकंदासाठी तरी त्याकडे चोरून का होईना, घाबरत का होईना तुम्ही बघायला लागला आहात...
बाया खोटे नाटे आरोप लावतील असा विचार करून का होईना पण बाईला चोरटा स्पर्श होणार नाही याची काळजी घेताहात,
जर तसा स्पर्श तुमच्याकडून झालाच चुकून तर माफी मागत आहात...
ज्यांना गर्भात मारता नाही आलं त्यांना रस्त्यावर बिनधास्त फिरायला मिळणाऱ्या  आयुष्यासाठी त्या बायांनी तुमचं ऋणी राहिलं पाहिजे या आवेशापासून हळूहळू लांब येताहात...

मुद्दा निव्वळ अलोक नाथचा नाही, मी महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र माझा असल्याने नाना पाटेकरांचा तर त्याहूनही नाही...मुद्दा तुमच्या-आमच्यातल्या पुरुष आणि स्त्री या आदिमत्वाचा आहे हे समजून घेण्याच्या दिशेने समाज म्हणून रांगायला लागला आहात... नर आणि मादी यापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून एकमेकांची दखल घेण्यापर्यंत आपला समाज पोहोचायला आणखी बराच काळ जाईल; पण तिथपर्यंत आपण पोहूचू या विश्वासाची ज्योत पेटवायला लागणाऱ्या वात, तेल , काडेपेटी इत्यादी साहित्याची जुळवाजुळव करायचा काळ सुरू झाला आहे...
म्हणून. आणि निव्वळ म्हणून एक स्त्री म्हणून या काळाचे आभार मानावे वाटतात.
#धन्यवाद.

तळटीप: जन्मभरात जितक्यांदा दादर स्टेशनला गेले तितक्यांदा माझ्या अंगावर फिरलेल्या हातांचे ठसे माझ्याकडे नाहीत.
बस मध्ये बसल्यावर मागच्या बाजूने आलेल्या हातावर जेव्हा मी फटका मारून ओरडले होते तेव्हा त्या काकांनी तसं काही केलंच नाही असं म्हंटल्याने त्याचाही पुरावा माझ्याकडे नाही...
प्रवासात कॉलेजमधल्या मुलींना मागून घसट करताना जेव्हा मी एका पुरुषाला पाहिलं तेव्हा फोटो काढायचा राहिला...
रेल्वेच्या डब्यात एकही बाई नाही,प्रवास लांबचा आणि रात्रीचा; आपली पोरगी सकाळी व्यवस्थित पोहोचेल का या चिंतेने ग्रासलेल्या माझ्या वडिलांच्या डोळ्यांचा स्क्रीनशॉट काढता आला नाही...
नाहीतर पुरावे बरेच देता आले असते.
पण हेही नसे थोडके की जगण्याचा ताण हलका करायला इथं फेबु वर येऊन कोणताही व्हीडिओ/कागद वगैरे पुरावा म्हणून नसताना इथपर्यंत वाचलं तुम्ही.

पुनश्च #आभार ...

-प्राजक्ता
#metoo