Tuesday, 3 May 2016

कविता रुजत जातात...

मी माझ्यातल्या कवयित्रीला विचारलं
तू कुठून येतेस?
ती म्हणे कवितेतून,
मी कवितेला विचारलं
तू कुठून येतेस?
ती म्हणे शब्दांतून,
मी शब्दांच्या संदिग्ध मालेला विचारलं
ग बाई तू कुठून येतेस?
ती म्हणे
तुझ्यातूनंच!

मी म्हंटल खोटं
साफ धडधडीत खोटं.
मी न पाहिलेल्या काळोखाचे
व्रण माझ्यावर उमटतात
न अनुभवलेल्या लक्ख प्रकाशाने
घेरलं जातं मला
हे सारं माझं नाही
मी यांची नाही
आम्ही एकमेकांचे नाही.
मग कोणाचे? कोण आहोत?
प्रश्न अनुत्तरीत राहतात
कविता रुजत जातात...

-प्राजक्ता
#एकमुक्तती.

Sunday, 1 May 2016

जगण्याची कला!

जगणं शिकत नाहीच कोणी... आपलं तीळ तीळ मरणं लपवायला शिकतो फक्त आपण. ती एक कला आहे. जगण्याची कला! आणि आपल्यातले कित्येकजण आपापल्यापरीने कलाकार आहेत.

हे 'लपवणं' इतरांपासून लपवणं असू शकतं आणि अगदी खुद्द स्वतःपासूनही. अज्ञानातलं सुख शोधण्याचा एक भोळा प्रयास. 'माहित नाही' म्हणजे ते 'घडत नाही' असं नसतं. पण 'आपल्या माहितीत ते घडत नसतं' . याची देही याची डोळा बघत नसलो आपण किंवा मुद्दाम पाठ फिरवून उभे असलो आपण तरी त्रास हा होतोच. हा, फक्त तो लपवावा लागत नाही. साक्षीदार झालात तर मग कसरत करावी लागते. मनात एक अन् चेहऱ्यावर एक असं येऊ न देण्याची.

'जगण्याला सामोरे जा' म्हणजे 'खोल दरीत उडी मारा' असा सल्ला वाटावा इतकं भीषण जगणं असतं काहींचं.  तेव्हा दरीकडे पाठ फिरवून उभं राहणंच सुरक्षित वाटतं... आणि अगदीच सौख्यभर जगायचं असेल तर मग पाठ फिरवल्या बरोब्बर दरीला पाठमोरं टाकत पुढे निघून जायचं.

अज्ञानातलं सुख अर्थातच फसवं असू शकतं, पण पर्याय नसतो. स्मरणशक्तीच जेव्हा घात करू लागते तेव्हा तिच्या  शत्रूपक्षाची मुद्दाम आळवणी करणं भागच असतं. पण हेही खरं की विस्मरणशक्तीचा कृपाप्रसाद मिळवणं अधिक कठीण काम. म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर - रट्टा मारा, कशाना कशाशी ती सलंग्न करा, जळी स्थळी काष्ठी पाषाणी ती दिसत राहील याची तजवीज करा...स्मरणशक्तीसाठी हे पुरेसं आहे. पण काही विसरायचंय म्हणा! ते आठवत राहते. बे दुणे चार हे विसरायचं विसरायचं म्हणत राहा...अनावधानाने तुम्ही रट्टा मारताय, उजळणी करताय...
स्मरणशक्ती देवी प्रसन्न !!! __/\__

काय काय विसरायचंय याची यादी करत गेलो तर मग आठवत नसलेल्या आठवणीही आठवतात. एकदा जगलेलं पुन्हा पुन्हा जगत गेलो आठवणीत की मग अधोरेखित होत जातं त्यांचं अस्तित्व. आणखी कुचंबणा. अशा अनेक कुचंबणांना व्यक्ती सामोरं जाते, तरी जगते...हसते, कधी क्षुल्लक वाटाव्या अशा कारणांसाठी रडते, कटिंग मारते अन् डावी उजवीकडे बघून रस्ताही क्रॉस करते.

ना आपल्याला जगावं कसं हे शिकवलं जातं; ना जगणं नाकारावं कसं हे! प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार दोन्ही गावांचे पत्ते विचारत विचारत जिथे पोहोचावं वाटतं तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार. खरंतर जगावं का?आणि कशासाठी यावरच बरंच काही बोललं जातं. तसं असलं तरी प्रयोजनाची व्यक्तीनिष्ठता वैश्विक उत्तरापर्यंत पोहोचू देत नाही. आपण ज्या कारणासाठी जगतोय असं आपण समजत असतो त्याच कारणामुळे आपण तीळतीळ मरतही असू!...ग्लास अर्धा भरलेला कि रिकामा जुनी गोष्ट आहे, ती सोडा. पण प्रयोजनाच्या साध्यतेनंतरही आपण मग खऱ्या अर्थाने जगू का?... बहुदा नाहीच. जुन्या प्रयोजनाची जागा नवीन प्रयोजन घेते किंवा प्रयोजन प्राप्तीच्या देवत्वाला टाकीचे घाव काही विसरता येत नाहीत. ते टाकीचे सोसलेले घाव आठवताना नजर कोरडी ठेवण्याची कला जमली म्हणजे 'तीळतीळ मरणं लपवणं जमलं'. पण जगाच्या दृष्टीने याचा अर्थ तुम्ही 'जगणं शिकलात' असाच होतो.

जगणं शिकणं ही संज्ञाच फसवी आहे. लपाछुपीचा डाव फक्त रंगवत नेतो आपण.
लहानपणी आपण स्वतःला लपवतो;
अन् पुढे जाऊन समजूतदारपणे आपल्या भावना , वेदना, स्वप्नं...!

-प्राजक्ता.


Thursday, 7 April 2016

मेळघाट डायरी : एक फोटो एक आठवण.

मनुष्याचे म्हणे तीन चेहरे असतात. एक जो इतरांना माहित असतो, एक जो आप्तेष्टांता माहित असतो
आणि एक जो स्वतःला माहित असतो.
पण त्याही पलीकडे आपल्यात अश्या काही भल्या-बुऱ्या गोष्टी असतात की आपल्यालाही माहित नसतात.
मेळघाटात जाण्याचा निर्णय हा पहिला असा निर्णय होता जो 'आतला आवाज' ऐकून कोणताही विचार न करता घेतला होता. स्पर्धा-परीक्षा करणाऱ्यांना बरेच निर्णय,छंद, छंदवर्ग पुढे पुढे ढकलण्याची सवय असते... (कदाचित सर्वच क्षेत्रातल्या लोकांचा हा अनुभव असू शकतो पण मी माझ्या अनुभवविश्वापुरतं सध्या बोलतेय.) त्याप्रथेनुसार हा ही एक निर्णय असाच जो मला नंतर कळला कि माझा छंद आहे.
छंद झाला. सामाजिक कार्याची आवड वगैरे सगळ्या पोकळ बाता आहेत. वर्षातले 10 दिवस हा काही कार्य म्हणण्याइतका कालावधी नाही. आणि सामाजिक हेतू तर यात शून्यच. एक व्यापक स्वार्थ यात मला सापडला. समाधान देत गेला. देत आहे. Everyone is self centred, it's just radius that differs अस वाचलेलं त्याचा प्रत्यय या अनुभवाने दिला. मला काहीतरी आनंद देत राहत ते सामाजिक हेतूने प्रेरित नसतच. तो स्वार्थच. प्रेमाचा. आपुलकीचा.

मुलामुलींसोबत दरवर्षी आम्हीही शिकत गेलो. 100 दिवसाची निवासी शाळा ही सर्वात जवळची वाटत राहते कारण पूर्णवेळ आम्ही मुलामुलींसोबत काहीनाकाही explore करत राहायचो.
पुढे खरा व्यवस्थेशी संपर्क येऊ लागला. आदर्शवादी काल्पनिक जगातून वास्तवाकडे नेलं मैत्रीच्या पुढच्या प्रयोगांनी. तो गरजेचाही होता.

आपल्याला काहीच येत नाही आपण काय दुसऱ्यांना शिकवणार या न्यूनगंडातून बाहेर काढायला मदत केली ती आमच्या मेळघाटातल्या या बच्चेकंपनींनी.
त्यांच्यासाठी त्यांच्या समोरचे दीदी-दादाच सर्व काही असतात. बाहेरच्या जगातून आलेले सर्वज्ञानी. पण म्हणून तुमच्या चरणाचं तीर्थ बिर्थ ते पित बसत नाहीत कधीच. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत नाहीत. विनाकारण तुमचा उदोउदो करत बसण्यात त्यांना रस नसतो. म्हणजे आपल्यात जे काही उच्च आहे त्यांची ओळखही ते आपल्याला करून देतात आणि पुन्हा डोक्यात हवाही जाऊ देत नाहीत.

मला शिकवता येत नाही. आणि चिल्यापिल्यांना तर नाहीच नाही या मताचीही मी होते, जातानाच Ashwini ताई, Vaishaliताई आणि शोभा ताईंना तस म्हंटलेलंही मी, पण त्यांनी जो विश्वास तेव्हा दिला तो खरच कामी आला. शिवाय तिथे गेल्यावर हेही जाणवलं कि त्या बाळांनी आपणच माझ्यातल्या शिक्षकाला घालवून दीदीला मोठं केलं.शिक्षकाची जी अनावश्यक छबी मनात बनलेली असते त्यात एक मुद्दा असतो परिक्षणाचा आणि हुशार बिशारचा शिक्का मारण्याचा. दीदी दादा हे करत नाहीत. ते बघतात की शारदा आपलं नाव चुकीचं लिहितेय कितीही शिकवलं तरी,
मग ते तिला शरद लिहायला शिकवतात
मग शारादा
मग शारदा... फरक ओळखायला सांगतात.
निव्वळ पाटीवर नाही झाडाखाली मातीत किंवा कॅम्पसमधल्या भिंतीवर किंवा तिने काढलेल्या चित्रात कुठेही. शारदा जेव्हा आपलं नाव नीट लिहू लागते तेव्हा सामान्य शिक्षकाला प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुलीला पाहून जो आनंद होईल तो आनंद दीदी-दादाला होतो. आपल्या सामान्य शिक्षण व्यवस्थेत इतका वेळ कोणाकडे आहे? या प्रश्नावर मी अस म्हणेन की नको त्या गोष्टींवर भर न देता निव्वळ आकलनावर भर दिला आपण तर खूप गोष्टी सोप्प्या होतील. आकलन फक्त विद्यार्थी-विद्यार्थिनीचंच नाही तर आपलंही. मूला-मुलींना आदर्श समाजाची तत्वे मूल्ये शिकवताना ती काल्पनिक वाटू नयेत म्हणून खराखुरा आदर्श समाज घडवण्याची सर्वतः जबाबदारी आपली आहे हे आपण सोयीने विसरून जातो. 

2012मध्ये पहिल्यांदा जेव्हा मेळघाटात गेले तेव्हा पासून आतापर्यंत जितक्यांदा गेलेय तितक्यांदा वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध झाले आहे. तुम्ही माझ्याशी कशाबद्दलही बोला पण -मेळघाट, तिथले मुलमुली,आरोग्य मैत्रिणी, गाव मित्र, Madhu भाऊ, Chandrakant(चंदू)भाऊ,Rameshwar(राम)भाऊ, Ramesh भाऊ, दिलीप भैय्या, Rajaram(राजा)भाऊ हे सगळे कसे ना कसे माझ्या बोलण्यातून येत राहतील. कारण ते आता माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाले आहेत.

Raju J. A. Kendre Arpita Ghogardare Nikita Joshi Babloo Ahiwale ही गॅंग जरा उशिराच भेटली पण त्यांनीही मेळघाट माझ्यासाठी आणखी स्मरणीय केलं आहे. (आणि त्यांचा नीचपणा पाहता मला यापोस्ट वरून काहींना काही बोललं जाईल अशी खात्री वाटत असूनही त्यांना टॅग करते आहे तर मेळघाटाने मला धाडसही दिले आहे अस मी म्हणेन :D )

मेळघाट मित्र हे कायमचे घर झाले आहे आता आणि चिलाटी गाव. आज या फोटोच्या निमित्ताने सगळं एकत्र समोर आणून ठेवलं झुक्याभाऊंनी.

फेबूच्या स्मरणिकेत आज हे दाखवलं गेलं... या स्मरणिकेचं
एक बरं आहे... भूतकाळात आपण किती मूर्ख होतो हे दाखवणाऱ्या पोस्ट्स डिलिट करून टाकत राहायच्या आणि अश्या पोस्ट्स आल्या समोर की तो अनुभव देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. आभासी असलं तरी जवळचं होतं अश्याने हे जग. :)

-प्राजक्ता.

Monday, 22 February 2016

भविष्यातल्या एका संवादातून...

"एका आटपाट नगरातल्या एका टपरीवर.

१: तुला माहित्ये मला मत आहे!
२: त्यात काय एवढं? मलाही आहे.

१: तुझंही तेच मत आहे का जे माझं आहे?
२: काही कल्पना नाही बुवा.

१: माझं हेहे मत आहे
२:  ओह् ! नाही नाही माझं तेते मत आहे.

१: काय!!!!!! कस शक्यय? हे तेते चुकीचं आहे.
२: असं काही नसतं बघ. तुझ्यादृष्टीने तुझं मत मोलाचं मला माझं.

१:पण हे संयुक्तिक नाही. दोन सत्ये कशी असू शकतात?
२: काहींच्यामते तर 7 सत्ये असतात.

१: विषयाला फाटे फोडू नकोस. तुला मत बदलावं लागेल.
२: ठीके चर्चा करू
१: तुम्ही नियम बाह्य वर्तन करत आहात.
शिक्षा ही झालीच पाहिजे.

...मग यांनी नारे दिले. त्यांनीही दिले. यांनी त्यांचे हाणामारीचे मार्ग अवलंबले त्यांनी गोळा होऊन शब्दांच्या फैरा झाडल्या. मग त्यातून पुढे नियमांचे संकेतीकरण नव्याने झाले. प्रस्थापितांच्या संगीतखुर्चीत जो पर्यंत संगीत थांबलंय तोपर्यंत खुर्चीतल्यांचे नियम चालवायचे हाच एक अलिखित नियम झाला."

भविष्य: मग?

भूतकाळातील वर्तमान: मग काही नाही. आपल्यासारखे बघे फक्त मतामतातला फरक करायला शिकू लागले आणि जगणं सुसह्य झालं.

भ: तो कसा?

भू. व. : मत ( ओपिनियन ) आणि मत ( वोट )
यातला फरक.

भ: मग मला कोणतं मत असायला हवं?

भू.व. : कार्ड मिळेपर्यंत पाहिल्यावर काम कर.
कार्ड मिळाल्यावर दोन्हींवर करायला शिक.

भ: :)

-प्राजक्ता.
#आशावादी_राहीन_म्हणते.

Thursday, 11 February 2016

अर्पणपत्रिका

मागे बरंच काही चालू असताना ती बोलत होती...
"... माझ्या शब्दांमध्ये मला शोधू नका...
कारण 'ती' मी अजून मलाही माहित नाहीए. अजून घडतेय की उलगडतेय... हेही ठरायचंय.
'तुमच्या सोबती'ची मी ही 'त्यांच्या सोबती'ची मी नसते.
'इथली' मी ही 'तिथल्या' मी पेक्षा वेगळी असते.
अर्थात, 'विरोधाभासी' (contradictory) नाही किंवा 'विखंडीतही' (fragmented) नाही. 
एकसंध आहे ... अपरिपूर्ण (Imperfect) असले तरी. 
माझे शब्द म्हणजे मी नाहीए, तर जगाला अनुभवतानाचे माझे ते उद्गार आहेत.
फक्त माझ्याच नाहीत तर ओळखीच्या/अनोळखीच्या अनेकांच्या नजरेतून मला दिसणारं असं काही आहे ते. नाही; नैतिक जबाबदारी झटकण्याची ही पद्धत वगैरे नाहीए.
खरंतर या विश्वातलं नेमकं माझं असं विश्व कोणतं आणि इतरांचं कोणतं?... हे वेगळं काढणं जमत नाही अजून! परस्परांना आच्छादून टाकत त्यांची द्वैत-अद्वैताची लपाछुपी चालू असते विचारांच्या गल्लीत.
त्यामुळे शब्दांची निष्ठा संदर्भानुसार बदलत राहते. हा काही विश्वासघात-बित म्हणता येणार नाही.
 त्यानिमित्ताने निरनिराळ्या छटा कळतात... न्याहाळत राहणं सध्याचा अजेंडा.
ठरेल हळूहळू स्वतःच्या अवकाशात कोणते रंग भरायचे; भरायचे किंवा नाहीत ते.
तोपर्यंत या भेटणाऱ्या शब्दांचे ऐकत राहावंच लागेल..."

... अजूनही सवय गेली नाहीए म्हणजे. तसंच विस्कळीत बोलत राहणं. समोरच्या व्यक्तीला एक धागा सापडतो ना सापडतो तो दुसरी रीळ सोडायची. शेवटचे भेटलेलो...(भांडलेलो!) तेव्हाही असंच काही शब्द होते. म्हणजे रागाने भरलेले पण शांत, निग्रही. आपण आपल्या ठामपणावरही ठाम राहू शकत नाही आणि हिच्याकडे मात्र 'ढिलाई ही इतकी ताठर असू शकते' असं वाटावं इतका ठामपणा. तेव्हाही हेवा वाटायचा.पण असो...
काय बरं शब्द होते ते?? अगदीच पोएटिक वगैरे ??!!! हां!!! "आठवण आलीच कधी तर विसरण्याचा प्रयत्न कर, आणि आलो समोरासमोर कधी आपण तर टाळण्याचा प्रयत्न कर"..... ( तिचं हे नेहमीचंच ; स्वतःला जमणार  नाहीत ती  कामं  इतरांना करायला सांगायची...) सांगितलं होतं, टाळण्याचा प्रयत्न कर म्हणून.... तरी अक्खा सत्कार सोहळा पाहिला आपण. इतक्या गर्दीत आपण शेवटून 11व्या रांगेत आणि पुढून बहुदा 2..5..7...8....10 आणि ही 13; हां 13व्या रांगेत बसलो आपण, म्हणजे लवकर येऊनही पुढे जागा मिळत असतानाही आपण या अधल्या मधल्या रांगेची बसण्यासाठी निवड केली. म्हणजे शब्द पाळलाच आपण. टाळलंच आपण नजरेच्या टप्प्यात येणं. दिसलो असू का आपण? वाटत नाही. एखादं तरी वाक्य आपल्याला उद्देशून आलंच असतं ना पूर्ण भाषणात! तशी धार वाटली नाही आज. तिरस्कारही कमीच वाटला. कसं असतं ना,आपण आपल्याला माफ केलं म्हणजे अगदी दुसऱ्यांच्यावतीनेही आपण स्वतःला सहज प्रशस्तिपत्रक देऊन मोकळे होतो.
"इतकी वर्ष झाली आता थोडीच तितका राग असणार आहे कोणाला? छे! "
असं मोठ्याने पुट्पुटल्यावर आपल्याला भान आलं की कोणाचा धक्का लागला तेव्हा आलं हे अजूनही कळलं नाहीए. पण भाषण बाहेर थांबायच्या आधीच इथे आत ऐकणं कधीचंच थांबलं होतं हे ध्यानात आलं. 

"स्टेशनला जायला बस कुठे मिळेल?" असं एकाला विचारू म्हंटल तर त्याच्या हातातल्या पुस्तकातला बुकमार्क बघून नकोच म्हंटल त्याच्याशी बोलायला. हाताहातात पुस्तक दिसतायत. किंमत कमी आहे की खरंच खपतंय आमचं  एकत्रित दुःख जोमाने? गम्मत म्हणजे आपणही विकत घेतलीये त्या दुःख-विच्छेदनाची एक प्रत!!! उरलेले पैसे ??? घेतलेच असतील. बुकमार्क? एक मिनिट...bag उघडून पाहिलं. अरे हो आहेच यातही!
पुस्तकावर फ्री आणि वर हे quote!!! श्या मूर्खपणाच झाला. बुकमार्कला घाबरून त्या माणसाशी बोललो नाही आपण !!! (बस कळली तरी असती). कॅन्टीनचा चाचा नेहमी म्हणायचा - जिसको ढूंडा गली गली वो घर के पिछवाडे मिली... आलोच आहोत तर त्यालाही भेटावं का ?
"भैया भैया स्टेशन आओगे??" श्वास उच्छवास ह्या क्रिया ज्या सहजपणे नकळत पणे घडत जातात तसंच झालं. स्टेशनला जायची बस विचारत बसण्यापेक्षा रिक्षा करून जाण्याचा निर्णय आपल्या नकळत आपल्या मेंदूने कधीच घेतला होता बहुतेक. त्याशिवाय का आवाज फुटला आपल्या तोंडून?
बसताना विचार आला याच घाईने तर पर्याय निवडले नाहीत ना आपण? निर्णय घेतले तेव्हा भान होतच किती आपल्याला? वाहत्या पाण्यासोबत गटांगळ्या खात 'आता हे बरोबर' 'मग ते' असं वाटत राहिलं आणि
 मग...कधी आपण रिक्षात बसलो तेही कळलं नाही आपल्याला.
पण रिक्षाशिवाय तसाही पर्याय होताच कुठे आपल्याला- आपल्याच कोर्टात आपल्याच खटल्यात आपणच आपली बाजू मांडण्याचा हा प्रकार! पण खरंच काय केलं असतं आपण थांबून? 

दुसऱ्या कोणाला विचारलं असत काही आणि विषय वाढत वाढत गेला असता मग ते म्हणाले असते कि
"का हो? तुमचा कसा परीचय यांच्याशी?'' किंवा
आयोजकांची गाडी गेली असती तिथूनच मग काय केलं असतं? 
तेव्हा हेच बरं केलं आपण. काहीही विचार चालू होता हे खरं असलं तरी वाटणारी भीती खोटी नव्हती. 
"आयुष्य अगदीच सोप्प असतं असा गुंतगुंतीचा विचारच का करा?" असं तिनं म्हंटल्यावर आपण नेहमी म्हणायचो ते या भीतीसारखंच खरं होतं- "आयुष्य अगदीच सोप्प असतं; कठीण असतं ते या मतावर ठाम राहणं"... 
'शब्दांचं ऐकावं लागेल' म्हणणार्यांनी आपलं कधी ऐकलंच नाही ही भावना शरीरभर पसरली अचानक. 
नवनवीन प्रेमात पडणारे आपल्या लेकरांची नावं ठरवतात आम्ही कव्हरपेजचा रंग ठरवला होता...रंग एकच पण त्याच्या 3 छटा वापरायच्या हेही ठरलंच होत. गर्दीच्या भीतीने आपण पुस्तकही नीट पाहिलं नाहीए असं जाणवलं तेव्हा "छब्बीस रुपया"झाले होते.
नेहमी प्रमाणे सुट्ट्याच्या अभावी वरच्या 4ला मुकत स्टेशनात घुसणं ओघाने आलंच. बुकमार्क मुद्दामच दिला असणार फुकट. म्हणजे कशी ना कशी तरी ती तीक्ष्ण धार पोहोचायची होतीच आपल्याकडे. पोहोचलीच आहे तर आता सामोरं  जाऊयाच.
पुस्तक बॅगेतल्या एका कप्प्यात होतं. आपण गर्दीला घाबरूनच लगेच घेतल्या घेतल्या बॅगेत टाकलं होतं हे आठवतंय स्पष्ट. पण अजून हे धूसर आहे कि खरंच ती भीती नेमकी कोणाची होती?
गर्दीची? तिची? कि स्वतःची?
का भीती नव्हतीच ती? सुप्त इच्छा होती ती... पकडावी कोणीतरी आपली चोरी. कळावं कोणालातरी कि 'प्रवेश निषिद्ध' प्रदेशात घुसलोय आपण ते. 

तीनही छटा वापरल्या आहेत तर. यातच भरून पावलं होतं खरं म्हणजे. आता पुस्तक वाचायचीही गरज नव्हती. "अरे च्यायला तू इकडे कुठे?" मग कसायस, केलं कि नाही लग्न? अरे त्या दंड्याने साल्याने गांगोटेच्याच पोरीला पटवल्ल!!!  अनुला मुलगी झाली कालच, बायको सिरीयस आहे म्हणतात... बारक्याचा business मोठा झालाय फार! आणि काय आजपण पुस्तकं खरेदी का ??? ढिम्म बदल नाहीए तुझ्यात!!!" हे एवढं काही एका दमात बोललं गेलं तोंडावर... तेव्हा म्हंटल जाऊदे जवळचाच असणार आपला; त्याशिवाय का इतका बोलतोय !
नाव- गाव- फळ- फुल -आवड- निवड -सवड...  अश्या सगळ्या बातम्या असल्या आपल्याकडे एखाद्या/दि विषयी की "आपलं माणूस" हा शिक्का बसतो त्यांच्यावर. कधी आपण मारतो कधी समोरचे स्वतःहून येतात शिक्क्याखाली. अभिमानाची गोष्ट असते म्हणतात -आपण ;लोकांचे "आपलं माणूस'" असणं !...
तर हा 'आपला' बराच बोलत होता... आणि या देहाने रिक्शात बस्ताना संचारलेल्या त्या उर्जेनेच त्याच्या बऱ्याचश्या प्रश्नांना उत्तर दिली होती... तेही भलंच.
"कसली पुस्तकं वाचतो रे! काये हे?? अर्पणपत्रिकाच कशीए कॉमप्लिकेटेड"
बोलता बोलता आपली माणसं हात  हातात घेतात सहसा,याने हातातलं पुस्तक कधी घेतलं कळलच नव्हतं.

"उघडलंच नाहीए रे अजून, फ्रंटपेजच आवडलं खुप.  म्हणून म्हंटल बघू घेऊन"
जे बोललो ते ऐकल्याचं दाखवत तो-
"ठीके चल निघतो,गाडी लागेलच इतक्यात... ग्रुप वर ऍड करतोच तुला, बोलू मग"
बाय करायला त्याच्याकडे पाहणं अपेक्षित असतानाही थेट पुस्तक उघडलं गेलं हातून..

'अर्पणपत्रिका

अवकाशात भरायच्या राहून गेलेल्या 
तीनही छटांच्या एका रंगास '

तिथेच उभं असूनही गाडी सुटली होती… लक्षात आलं.

-प्राजक्ता. 

Thursday, 17 December 2015

तुमचं तथाकथित भावविश्व

 "भावनांनी भरलेलं 
कथेने चितारलेलं 
अनेकांना नाकारून 
स्वतःतून साकारलेलं !
पडून उठलेलं 
शिकून सवरलेलं 
तुमच तथाकथित भावविश्व;
त्यात-
हे आणि ते असतात 
हे आणि ते नसतात… 
हे आणि ते दिसतात 
हे आणि ते घुसतात !
तुमचं तथाकथित भावविश्व 
तुमचं असतं तरी किती?"

-प्राजक्ता.

Thursday, 19 November 2015

मृत्यू.


मृत्यू जेव्हा तुम्हाला नेत नाही

तेव्हा तुमचं बरंच काही नेऊ शकतो...
नेतो.
जाणारी व्यक्ती 
तुमच्यातला तिचा वाटा
ओरबाडून नेते...
आजी जाताना नातीला नेते
प्रियकर तुमच्यातल्या प्रेयसीला नेतो
मैत्रीण तुमच्यातली मैत्रीण घेऊन जाते!
अनेक भूमिकांमध्ये 
एकाच वेळी जगत असताना
तुमची एखादी भूमिका गळून पडते;
भार काही हलका होत नाही
जगणं मात्र जड जातं.
-प्राजक्ता.

Wednesday, 28 October 2015

मेळघाट डायरी; एक दिवस - एक अनुभव.


सकाळी साधारण ७-७.३० ला निघालो आम्ही. मी आणि मधूभाऊ. बाइकशिवाय पर्याय नव्हता. खरंतर, या अश्या दुर्गम भागात ‘तिच्या’मुळे बरीच काम करण शक्य झाली आहेत. मेळघाट,म्हणजे अमरावतीहुन पुढे ५-६ तासांच्या प्रवासावर, सातपुड्याच्या कुशीतील व्याघ्र प्रकल्पातील हा भाग. रामभाऊ, चंदुभाऊ, मधुभाऊ आणि इतर हे इथे आले ते १९९८ साली. टारगेट होतं ते अर्थातच कुपोषण आणि पर्यायाने आरोग्य. आज २०१४ साली मी आणि इतर स्वयंसेविका/सेवक आलो होतो ते येथील ‘गावमित्रांना’ प्रशिक्षण देण्यासाठी. मधुभाऊ त्यांना  शिकवणार की गावाचा नकाशा कसा बनवायचा,आरोग्याविषयीचे सर्वेक्षण कसे करायचे इत्यादी. आम्ही शिकवणार होतो की प्राथमिक शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थिनिना कृतियुक्त शिक्षण कसे द्यायचे ते.“फार कठीण नसाव्यात गोष्टी”...असं प्रथमदर्शनी वाटेलही.पण तिथे गेल्यावर कळत इथल्या स्टेशनरीच्या दुकानात जाऊन वही-पुस्तक घेण्याइतक सोप्प नाहीए तिथलं शिक्षण,अन हाकेच्या अंतरावर उपलब्ध असणार्या डॉक्टरकड़े जाऊन बी.पी. चेक करता येइल इतकंही “आरोग्य” जवळच नाही तिथे.
आम्ही ज्या शाळेत चाललेलो ती ‘सुमिता’ गावातली शाळा...१०-११ की.मी.चे अंतर. तसं या आधी आलेले तेव्हा कुही गावापर्यंत ७-८की.मी. पायी जाण्याचा अनुभव गाठीशी होता त्यामुळे बाइकने काम हलकेच केले असे वाटले होते. पण हा भ्रम काहीच वेळात मोडला गेला...तो हा की बाइक वर जाणे म्हणजे प्रवास सुसह्य होणे! THANKS TO, (‘WHOM SO EVER IT MAY CONCERN)’- रस्त्यांची दयनीय अवस्था!...एकादातर मी चक्क हसलेच,जेव्हा काही अंतर गेल्यावर एका खोदून सपाट केलेल्या जमिनीच्या भागाकडे निर्देश करून मधू भाऊ म्हणाले “हा रास्ता अमुक अमुक साली बनवला गेला...आणि मग या बाजूंच्या गावांकडे जाणं सोप्प झालं...” मधुभाऊंच्या बोलण्यात तथ्य असल तरी, मी इतकच म्हणू शकले की “अच्छा ‘इथे’ 'याला' ‘रस्ता’ म्हणायचं तर?” अर्थात जे आहे त्याची उपयुक्तता लक्षात येउन वाटल, ‘हेही नसे थोडके!’.
इतक्यात “सुमिताला जाताजाता इथल्या phcपण जाऊया,काम आहे.” भाऊ म्हणाले. मनात म्हंटल ‘पर्वणीच!’  कुपोषणासाठी ज्ञात असलेल्या भागातला सरकारी दवाखाना पहायला मिळेल,बरच झाल.भाऊंनी ‘इथे’ म्हणून जे अंतर सांगीतल ते होत ४किमी. चांगल्या रस्त्याच्या आणि कोणत्याही सार्वजनिक परिवहन सेवेशिवाय चे हे दुर्गम भागातील दवाखान्यापर्यंतचे अंतर गरोदर स्त्रिया अथवा कोणताही अतीव आजारी रुग्ण यांच्या साठी जीवघेणेच ठरते यात नवल नाही... phc अत्यंत सुसज्ज (वाटले तरी!). सर्व योजनांचे तक्ते बनवुन भिंतींवर लावलेले. मराठीतून. आमच्या तिथल्या पोरांना मराठी शिकताना येणार्या अडचणी आठवल्या... आमची तिथली पोरं - मातृभाषा कोरकू-बाजरहाट सारा हिंदीतून - आणि शाळेत मराठी! अश्या भाषिक गोंधळात वाढणारी! अन मग त्या सार्या तक्त्यांची उपयुक्ताताच कळेनाशी झाली. कदाचित इंस्पेक्शनसाठीची तयारी असेल ती. मधुभाऊंना तिथले डॉक्टर ओलाखतच होते.
चिलाटी गाव,आपल मेळघाट मित्र च्या ऑफिसच कॅंपस हा सारा परिसर तर आधीच मनात घर करणारा...त्यात सकाळी-सकाळी बाहेर पडून २-3 गावे पार करुन कामाच्या ठिकाणी पोहोचायचंय याविचारानेच मनाला हुरूप आलेला... तिथपर्यंत जाणारे रस्ते ओळखीचे नव्हतेच,पण तिथे गेल्यापासून एकच जाणवत होतं की कोणाची कोणाला ओळख असण्याची गरज तिथल्या व्यवस्थेला लागतच नाही. एक ‘रामराम’ ठोकला की पुढच सार सुकर होत...अर्थात ते ‘आता’. आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला तिथे केवळ अर्धा-एक दिवस जरी झाला असला तरी ज्या ‘मेळघाट मित्र’ च्या नावाने आपण तिथे वावरतो त्याला बरीच पार्श्वभूमी आहे. आज तिथे जाणार्या स्वयंसेवक/सेविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जी १०० एक ब्लँकेट्स ऑफिसमध्ये आहेत ती सुरवातीपासून तर तिथे नक्कीच नव्हती, गरम पाण्याचा बंब तरी कधी आणला काय माहीत? आणि ऑफिसचं पक्क बांधकाम? सुरवातीला एक झोपडीत काम सुरु झालं होतं म्हणतात... “आम्हालाच काय तर पँट मध्ये कोणीही दिसला तरी कोरकू जंगलात पळून जात. ” अस एकदा राम भाऊंनी सांगितल्याच आठवलं,म्हणून मी मधुभाऊंना विचारलं, “तुम्ही नक्की इथे का अन कसे आलात?” पुढे भाऊंनी जे सांगितलं तो सारा 'मेळघाट मित्र' चा आजवरचा इतिहास तर होताच,पण त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या जडणघडणीचाही तो प्रवास होता.
सन १९९८ साली MSW झालेले श्री. मधू माने सांगत होते; समाजकार्यात काम करायचं हे ठरवून पदवी घेतली. कामाच्या शोधात असताना ‘मैत्रीच्या’ विनिताताईंशी त्यांचा परिचय झाला. तेव्हा मेळघाटातला कुपोषणाचा प्रश्न अगदीच ज्वलंत झाला होता. अन्य नोकऱ्यांची प्रलोभनं टाळून त्यांनी मेळघाटात काम करायचं हे निश्चित केलं. रामभाऊ तिथे काम करतच होते. पुढे मधूभाऊ तिथे गेले. एकाचे दोन दोनाचे चार होत होत आजची तिथली राजाभाऊ, कालुभैय्या, दिलीपभैय्या, रमेश भाऊ बसंती दीदी तसेच अनेक गावमित्र आणि आरोग्यामैत्रिणी इत्यादींची टीम बनत गेली. घडत गेली.
कविता महाजनांच ब्र वाचलेल त्याला आता बरीच वर्ष झाली,पण तेव्हापासून जे “सेवाभावी संस्था = प्रमाणिकपणा” या समिकरणावर प्रश्नचिन्ह उठल ते कायमचच. पण मैत्रीची मला विशेष भावते ती गोष्ट म्हणजे स्थानिक नेतृत्व तयार करण्यावर असणारा त्यांचा भर... मधुभाऊंच सार ऐकल्यावर हे अस सगळ मनात चालू असताना...अचानक गाडीचा ब्रेक दाबून भाउन्नी हाक दिली... “पिन्नु!!!!!!”... “कैसा चल रहा है???... अब तो तू सरपंच बन गयी...”भाऊंनी त्या दीदीन्ची विचारपूस केली...अन त्यांनीही भाऊंची... “सुमिता जाके आताहू...” म्हणत भाऊंनी त्यांचा निरोप घेतला...ह्या 'पिन्नु' म्हणजे सुरवातीच्या काळातील आपल्या 'आरोग्यमैत्रीण'. त्यांचा एक किस्साही भाऊंनी सांगितला. असंच एकदा मेळघाटातल्या आपल्या आरोग्यमैत्रिणींना पुण्यात प्रशिक्षणासाठी नेलं होतं. फावल्यावेळात त्यांना शहरात फेरफटका मारायला नेलं असताना उंचचउंच इमारती पाहून पिन्नूदीदींनी विचारलं होतं, "हे सारं कोणी बांधलं? या खोल्या एकावर एक कोणी ठेवल्या? माणसालातरी हे शक्य नाही!" इतकं सिमित विश्व असणाऱ्या पिन्नू दीदी आज इतक्यावर्षांनंतर सरपंच झालेल्या आहेत. हा काही साधसुधा प्रवास नक्कीच नसणार. पिन्नू आपल्या सगळयांना परिचयाची होण्याइतकी ‘FAMOUS’ नसेल झाली पण आपल्या गावाची काम करण्याइतकी सक्षम नक्कीच झालीए याविषयीच समाधान इथल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. “लोग मिलते गए और कारवां बनता गया”... या प्रवाहातला पिन्नू दीदी  हा एक टप्पा होता. तसाच एक तोताराम. आम्ही ज्या गावात जात होतो त्या सुमितामधला आपला पहिला 'बोकोमित्र' (बोको म्हणजे कोरकूत मुले/बाल्य). बोकोमित्र ते ग्रामपंचायत सदस्य असा त्यांचा प्रवास. योगायोग असा की आम्ही सुमितातल्या शाळेजवळ पोहोचायला आणि तोताराम भाऊंची गाठ पडायला! त्यांच्याविषयी इतक ऐकल्यानंतर त्यांना भेटून खुपच आनंद झाला. “हा तोताराम,हाच तो ज्याने हे अस इतक अमुक तमुक केल...ही प्राजक्ता, ही अस-तस करते...” अस काहीस मधुभाऊ सांगतील आमची 'औपचारिक' ओळख करून देतील अस वाटलं होतं,पण सुदैवाने तस काहीच न करता त्यांनी माझीच एका वाक्यातली ओळख त्याना दिली, “स्कूल के काम के लिए आई हैं ये दीदी पुनेसे.” आम्ही दोघांनीही एकमेकांना रामराम ठोकला. भाऊंनी शाळा दाखवली, आपले तिथले गावमित्र सोमजीभाऊ तिथे होतेच. तोपर्यंत गावातल्या इतर कामांच्या पाहणीसाठी तोतारामढाईंसोबत गेले.(तेथे भाऊ या अर्थी 'ढ़ाई' असे संबोधतात)
सोमजीभाऊंसारखे अजून १0 गावामित्र १० गावांमधे आहेत. आपले बरेच गावमित्र हे स्वतः कोरकू असून आतासारख्याच नावाला चालणाऱ्या तिथल्या शाळांमधून शिकलेले. 'कृतीयुक्त शिक्षण' हे त्यांनाही नवीनच. तरी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न पाहून सुखावतो आपण. आज पुण्या-मुंबईहून बोलवावं लागणारं मनुष्यबळ भविष्यात लागू नये यासाठीचा हा दूरदर्शी कार्यक्रम! मी शाळेत गेले तेव्हा सोमजी भाऊंचा वर्ग चालूच होता. या आधीच्या स्वयंसेवकांनी दिलेल्या प्रशिक्षणानुसार त्यांचं शिकवून झाल्यावर त्यांच्या वर्गाला मी जवळ केलं. ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमातील काही भाग नमूना म्हणून शिकवला. 'वर्ग नियंत्रणाला' पर्यायी पद्धत म्हणजे 'मुलांना गुंतवून ठेवण्याची कला' त्यांना कळेल अश्या activities घेतल्या मुला-मुलींच्या. वर्ग सोडताना मोठ्ठा 'बाय- बाsssय' चा कार्यक्रम झाला. पुन्हा थोडं सोमजी भाऊंशी अभ्याससाहित्य वापराविषयी बोलले,मग तोतारामढाई आणि मधू भाऊ बोलत होते तिथे गेले.
निघालो तेव्हा १२, १२.३० वाजलेले....चिलाटीच्या ऑफिसमध्ये आरोग्य मैत्रिणींना प्रशिक्षणासाठी मधुभाऊंनी बोलावल होत,त्या वाट पाहत असतील या विचारासहच आम्ही तुलसी,वैशाली,सोमजीढाई,तोतारामढाईंचा निरोप घेतला. “भाऊ NRHM ची आशा आणि आपल्या आरोग्य मैत्रिणी यांच्यात काय फरक आहे?” आरोग्य मैत्रिणींचा विचार मनात घोळतच होता,म्हंटल विचारूनच घेऊ. “खरतर काहीच नाही.”- मधुभाऊ. “मग आपल्या आरोग्य मैत्रिणी आणि आशा एकाच दीदीला केल तर मदत नाही का होणार?” माझी शंका. कदाचित पुढे मधुभाऊंचा पूर्वानुभव बोलला असावा. मधुभाऊ म्हणाले, “आशा या पुन्हा सरकारी कामाच्या चाकोरित अडकतात,त्यामुळे आरोग्य मैत्रिणीच्या कामातली स्वायत्तता हरवण्याची भीती असते.” येतानाच आम्ही हातरुच्या PHCत जाऊन आलेलो तेव्हाचा प्रसंग आठवला. मैत्रीच्या पावसाळयातल्या ‘धड़क मोहिमें’दरम्यान एकही बालमृत्यु होऊ दिला नव्हता या सार्यानी...आणि phc तल्या डॉक्टरशी बोलल्यावर कळाल की गेल्या महिन्यात बरेच बालमृत्यु झाले!!! त्याच कारण देत डॉ.साहेब म्हणाले की “आम्ही तरी काय करणार? पालक येतच नाहीत मुलांना घेउन दवाखान्यात.”. सेवा 'पुरवणं’ आणि ‘सेवा करणं’ यात अंधुकसा फरक आहे,तो लक्षात यायला हवा आपल्याला हे पुन्हा एकदा नव्याने जाणवलं.
 मेळघाटातले निसर्गसौंदर्य हे अवर्णनीयच! अर्थात ते  फक्त आपल्यासाठीच. तो निसर्ग आणि तिथले गावकरी (आदिवासी) हे इतके एकरूप झालेले असतात की त्यांची नजर खिळुन वगैरे राहत नाही आपल्या शहरी लोकांसारखी. हा पण म्हणून त्यांना त्याची किंमत नाही असेही नाही. असाच एका स्वयंसेवकाला आलेला अनुभव. शाळेतल्या काही विद्यार्थ्यांसोबत रानातून जाताना जांभूळाच झाड लागलं. एक लहान मुलगा झाडावर चढला. स्वयंसेवकाला त्याने विचारल किती जांभळे काढू? स्वयंसेवक “काढ ४,५.”
“४ या ५??? कितना खाएगा वो बता,उतनाही निकालूँगा.” मुलाच उत्तर. हा प्रसंग एकीकडे आणि शहरात बसून अमाप विज,पाणी,इ. संसाधने वाया घालवत “SUSTAINABLE DEVELOPMENT” वर चर्चा झाडणारे आपण. कोण मागास आणि कोणाला पुढारलेले म्हणायाचे? उत्तर सोप्पय.
       चिलाटीत परतेपर्यंत आधी न पाहिलेल न अनुभवलेल मेळघाट अनुभवायला मिळालं. पहिल्या वर्षी गेले तेव्हा पूर्ण वेळ मुलांमध्ये कैंपस वरच जायचा. तेव्हा त्यांना शिकावताशिकवता मी खुप शिकले. नंतरच्या वेळी गेले तेव्हा शाळा-शिक्षक-शिक्षण-आणि पोरं यामध्ये रमले. यावेळी मात्र विविधांगी अनुभव घेता आला. एखादी योजना मग ती शिक्षणाची असो वा आणखी कोणती त्याचा एकांगी विचार करुन उपयोग नाही हे याची देहि अनुभवले. त्यांना म्हणजे आदिवासींना आपण फ़क्त अक्षरओळख देऊ शकतो,पण जीवनाची कितीतरी मुल्ये त्यांनी अजूनही टिकवून ठेवलीएत त्यांच्याही नकळत,ती शिकायला मात्र आपण तिथे जायलाच हवं. भाऊंनी एकदा विचारलं होतं मला, की ‘मला मेळघाटाने काय दिलं?’ काहीतरीच थातुरमातुर उत्तरं दिली मी तेव्हा, असं आता वाटू लागलं होत. दुपारची उन्हं चढली होती. पण तरी कैंपस मध्ये पोहचता पोहचता मला समृध्द करणार्या या आणि अश्या कित्येक अनुभवांनी मला मी सापडत गेले होते,याची जाणीव झाली आणि मनातच गारवा वाटू लागला.
फूलमा, बिसाय, सुनीता, मंगराई आणि इतर आरोग्यमैत्रिणी आल्याच होत्या,त्यांच्याशी गप्पा मारत भाऊ पुढच्या प्रशिक्षनाच्या तयारीला लागलेही होते. सरकारी ९-५च वेळापत्रकीय पध्दतीच कामकाज अजुन तरी इथे पोचल नाहीए,ते बरंच. बरीच काम ही गप्पा मारत अनौपचारिक पध्दतीनेच पार पडतात हे मनाला जास्तच भावत. आणि त्यामुळेच इथल्या कमाने शरीर,मन थकलेले आठवतच नाही कधी.
-प्राजक्ता. 

Sunday, 25 October 2015

"एकटीने" ...

एकटीने दुरचा प्रवास करणं, नाटक सिनेमाला जाण, रेस्तरॉमधे जाऊन हव्या त्या पदार्थांचा फडशा पाडणं, फार कशाला जवळच्या टपरीवर जाऊन एक स्पेशल मारणं...कोशातून बाहेर आणतात आपल्याला. 'सोबती'च्या 'सुरक्षा कवचा'तून बाहेर काढतात. आपल्याला वाटत सोबतीची सवय मोडली की जमेल अस एकटं राहण. एकटं पडण आणि एकटं राहण पसंत करणं यांतला फरक आत्मसात करायलाही वेळ लागतो खरतर. पण एकटीने हवं ते करायला सुरुवात केल्याशिवाय सोबतीची सवय...किंवा गरज मोडत नसते.

नुकताच एकटीने नाटक पाहण्याचा अनुभव घेतला आणि जाणवलं ; ITS NOT A BIG DEAL! खरंच इतकी काही मोठी गोष्ट नाहीए ती. सुरुवात कटिंग पासून झाली होती, म्हणजे आपल्याला असणारी चहाची गरज आणि इतरांची गरज याचा ताळमेळ साधत बसण्याची अनाठायी कसरत नकोशी झाली आणि अनावधानानेच सोबतीपेक्षा चहा महत्वाचा झाला. पुढे प्रवास केला आणि मग जाणवलं सोबतींमध्ये रमण्यापेक्षाही इतर बऱ्याच गोष्टी असतात अनुभवण्यासारख्या. भीती वाटते कधीतरी, मग ‘धाडस’ वगैरे सारखं काहीतरी दाखवून निभावून नेतो आपण. आणि मग तो एक मापदंड बनतो. कुठल्या पातळीपर्यंत आपली धाडस-क्षमता गेली आहे याचा.

कधी रस्त्यावरच्या भांडणात पडतो आपण; तेव्हा तिर्हाइत पुरुषाने “बरं झालं तू मधे पडलीस, कसंयना लेडिजचा matter (नवरा-बायकोच भांडण ज्यात नवरा त्या बाईला मारतोय हा matter!) असला की आम्ही (पुरुष) मध्ये पडलो तर बर नाय दिसत” असं म्हणेपर्यंत आपल्यालाही कळत नाही की बाह्यदर्शी आपण समाजाच्या ‘स्त्री’ संकल्पनेच्या अपेक्षित धाडस-क्षमतेहून जास्त काही केले आहे. एकटं राहील की खरं कळत आपल्यातल्या आत्मविश्वासाची मुळं कुठंवर खोल गेली आहेत.

सुरुवातीला हे सारं नेणिवेतून जाणीवेत येइपर्यंत आपण काही विशेष करतोय हे लक्षात येत नाही. मग पुढे इतरांच्या नजरांमधून कधी काळजी, कधी हेवा, कधी आश्चर्य, कधी दया (की बापरे! बिचारी....एकटी) हे आपल्याला दिसू लागतं. बाकी सारं आपल्याला हसण्यावारी नेता आलं तरी लोकांना आपला हेवा वाटतो हे पाहून कधी आपला अहम सुखावतो. 'ग ची बाधा' होऊ लागते. आपल्याला कोणाची गरज नाही असंही कधी वाटू शकतं. अर्थातच Aristotle ने जे ‘MAN’ विषयी मांडलं ते खरंतर सर्व HUMANS ला लागू आहे. Womenसुद्धा सामाजिक प्राणीच असतात ना.

आपण सारे अशी बेटे आहोत जी वरवर पाहता विभक्त दिसतात पण पाण्याखाली सर्व एकमेकांशी सलंग्नच असतात. त्यामुळे इतरांची गरज नाही ही धारणा फार काळ टिकत नाही. 'ग ची बाधा' गेली हे कसं समजावं? तर एरवी एकटे जाण्यास तयार असणारे आपण खरंच कंटाळा आला / एकटे वाटत असेल / किंवा उगाचच सोबत हवी वाटत असेल तेव्हा विनासायास जवळच्या व्यक्तींना ‘सोबत येणार का?’ अशी विचारणा करू शकतो. शिवाय समोरच्या व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्यही देतो.

एकटं राहणं पसंतीस पडू लागलं म्हणजे ‘अगदी माणूसघाणी झाली ही तर’ असं म्हणणं किती बाळबोध होईल हे तर सांगायला नकोच. तरी स्वातंत्र्याची खरी चव चाखायाची तर सर्वच मानसिक बेड्या तोडायला हव्यात हे याच एकटं राहण्यातून कळतं. यामुळे निव्वळ आपलंच स्वातंत्र्य टिकतं असं नाही,तर एरवी फक्त आपल्याला हवं म्हणून समोरच्या व्यक्तीने तिचा वेळ आपल्याला देण्याची जी नकळत सक्ति आपण त्यांच्यावर करतो त्यापासून त्यांचीही मुक्तता होते.

आपल्यावरच्या प्रेमापोटी ते येतात सोबत किंवा आपण देतो त्यांना सोबत वगैरे युक्तिवाद हे प्रेमाची अजून अद्याक्षरे गिरावणार्यांचे युक्तिवाद वाटतात. आपली खरी सोबत करणारी माणसे आपल्याला कधीच अधू बनवत नाहीत.आपल्याला त्यांच्यावर किंवा इतरांवर अवलंबून रहावं लागेल अशी मानसिकता तयार होऊ देत नाहीत.खरी सोबत किंवा प्रेम करणारी माणसं ही आपल्याही नकळत आपल्याला आपल्या स्वतःसोबत जगायला शिकवतात.जगाने पाठ फिरवली म्हणून ‘एकला चलो रे’चा झेंडा हाती घेण्याची वेळ येते काहींवर;पण सुदैवाने तशी वेळ आली नसली तरी एखादा प्रयोग म्हणून 'आपण' स्त्रियांनी तसेच मुलींनी अश्या ‘एकटी’च्या सफरीचा अनुभव घ्यायलाच हवा.


ता.क़.- इथे इतकं स्त्री-विशिष्ट बोलण्यास कारण की पुरुषांना व मुलांना ही संधी बाहेरून सहज मिळते. त्याचा लाभ घेणं जितके पुरुषांना सुकर आहे तितके स्त्रियांना नाही. उदाहरणार्थ-सुरक्षिततेचा मुद्दा.
-प्राजक्ता.

"एक मुक्त....ती"


हरवली आहे,
एक कविता...
तश्या ठेवणीतल्या
बऱ्याच कविता
तुझ्यापासून लपवल्या,
तू वाचण्याआधीच खोडल्या,
काहींचा गळा गर्भातच घोटला,
तर काही
कळ्या होताहोता खुडल्या...
हीच जाणं तसं
अकाली
अनपेक्षित !
अजून ती ओठांवर खेळायची होती
रक्तात भिनायची हाडात शिरायची होती...
उरली आता
गाफिल 'मी'च्या आठवणीतली
एक मुक्त....ती.
-प्राजक्ता