Tuesday 3 May 2016

कविता रुजत जातात...

मी माझ्यातल्या कवयित्रीला विचारलं
तू कुठून येतेस?
ती म्हणे कवितेतून,
मी कवितेला विचारलं
तू कुठून येतेस?
ती म्हणे शब्दांतून,
मी शब्दांच्या संदिग्ध मालेला विचारलं
ग बाई तू कुठून येतेस?
ती म्हणे
तुझ्यातूनंच!

मी म्हंटल खोटं
साफ धडधडीत खोटं.
मी न पाहिलेल्या काळोखाचे
व्रण माझ्यावर उमटतात
न अनुभवलेल्या लक्ख प्रकाशाने
घेरलं जातं मला
हे सारं माझं नाही
मी यांची नाही
आम्ही एकमेकांचे नाही.
मग कोणाचे? कोण आहोत?
प्रश्न अनुत्तरीत राहतात
कविता रुजत जातात...

-प्राजक्ता
#एकमुक्तती.

Sunday 1 May 2016

जगण्याची कला!

जगणं शिकत नाहीच कोणी... आपलं तीळ तीळ मरणं लपवायला शिकतो फक्त आपण. ती एक कला आहे. जगण्याची कला! आणि आपल्यातले कित्येकजण आपापल्यापरीने कलाकार आहेत.

हे 'लपवणं' इतरांपासून लपवणं असू शकतं आणि अगदी खुद्द स्वतःपासूनही. अज्ञानातलं सुख शोधण्याचा एक भोळा प्रयास. 'माहित नाही' म्हणजे ते 'घडत नाही' असं नसतं. पण 'आपल्या माहितीत ते घडत नसतं' . याची देही याची डोळा बघत नसलो आपण किंवा मुद्दाम पाठ फिरवून उभे असलो आपण तरी त्रास हा होतोच. हा, फक्त तो लपवावा लागत नाही. साक्षीदार झालात तर मग कसरत करावी लागते. मनात एक अन् चेहऱ्यावर एक असं येऊ न देण्याची.

'जगण्याला सामोरे जा' म्हणजे 'खोल दरीत उडी मारा' असा सल्ला वाटावा इतकं भीषण जगणं असतं काहींचं.  तेव्हा दरीकडे पाठ फिरवून उभं राहणंच सुरक्षित वाटतं... आणि अगदीच सौख्यभर जगायचं असेल तर मग पाठ फिरवल्या बरोब्बर दरीला पाठमोरं टाकत पुढे निघून जायचं.

अज्ञानातलं सुख अर्थातच फसवं असू शकतं, पण पर्याय नसतो. स्मरणशक्तीच जेव्हा घात करू लागते तेव्हा तिच्या  शत्रूपक्षाची मुद्दाम आळवणी करणं भागच असतं. पण हेही खरं की विस्मरणशक्तीचा कृपाप्रसाद मिळवणं अधिक कठीण काम. म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर - रट्टा मारा, कशाना कशाशी ती सलंग्न करा, जळी स्थळी काष्ठी पाषाणी ती दिसत राहील याची तजवीज करा...स्मरणशक्तीसाठी हे पुरेसं आहे. पण काही विसरायचंय म्हणा! ते आठवत राहते. बे दुणे चार हे विसरायचं विसरायचं म्हणत राहा...अनावधानाने तुम्ही रट्टा मारताय, उजळणी करताय...
स्मरणशक्ती देवी प्रसन्न !!! __/\__

काय काय विसरायचंय याची यादी करत गेलो तर मग आठवत नसलेल्या आठवणीही आठवतात. एकदा जगलेलं पुन्हा पुन्हा जगत गेलो आठवणीत की मग अधोरेखित होत जातं त्यांचं अस्तित्व. आणखी कुचंबणा. अशा अनेक कुचंबणांना व्यक्ती सामोरं जाते, तरी जगते...हसते, कधी क्षुल्लक वाटाव्या अशा कारणांसाठी रडते, कटिंग मारते अन् डावी उजवीकडे बघून रस्ताही क्रॉस करते.

ना आपल्याला जगावं कसं हे शिकवलं जातं; ना जगणं नाकारावं कसं हे! प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार दोन्ही गावांचे पत्ते विचारत विचारत जिथे पोहोचावं वाटतं तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार. खरंतर जगावं का?आणि कशासाठी यावरच बरंच काही बोललं जातं. तसं असलं तरी प्रयोजनाची व्यक्तीनिष्ठता वैश्विक उत्तरापर्यंत पोहोचू देत नाही. आपण ज्या कारणासाठी जगतोय असं आपण समजत असतो त्याच कारणामुळे आपण तीळतीळ मरतही असू!...ग्लास अर्धा भरलेला कि रिकामा जुनी गोष्ट आहे, ती सोडा. पण प्रयोजनाच्या साध्यतेनंतरही आपण मग खऱ्या अर्थाने जगू का?... बहुदा नाहीच. जुन्या प्रयोजनाची जागा नवीन प्रयोजन घेते किंवा प्रयोजन प्राप्तीच्या देवत्वाला टाकीचे घाव काही विसरता येत नाहीत. ते टाकीचे सोसलेले घाव आठवताना नजर कोरडी ठेवण्याची कला जमली म्हणजे 'तीळतीळ मरणं लपवणं जमलं'. पण जगाच्या दृष्टीने याचा अर्थ तुम्ही 'जगणं शिकलात' असाच होतो.

जगणं शिकणं ही संज्ञाच फसवी आहे. लपाछुपीचा डाव फक्त रंगवत नेतो आपण.
लहानपणी आपण स्वतःला लपवतो;
अन् पुढे जाऊन समजूतदारपणे आपल्या भावना , वेदना, स्वप्नं...!

-प्राजक्ता.