Sunday 6 November 2016

त्या_आशयाभोवती...

लिहायला घेते मनातल्या मनात बऱ्याचदा.

कधी समोरच्या भेदरलेल्या नजरांमध्ये हरवून जातात वाक्ये, तर कित्येकदा निश्वासांसोबत बऱ्याच गोष्टी सुटून जातात .
बऱ्याच गोष्टी करायच्या असूनसुद्धा हातून काही होत नसते आणि सतत व्यस्त असूनही मागे वळून पाहिलं की डोंगर सोडा स्वकर्तृत्वाची एखादी टेकडीही दिसत नाही.
सालं साधं टोकाचं निराशावादीही होता येत नसतं, मग असलं तसलं,काही बाही, छूटूक मुटूक करत राहायचं.
झिजत राहायचं चंदनही न होता.

आत्मभान, साक्षात्कार अशा शब्दांच्या भेंड्या खेळत राहायचं स्वतःशीच! राज्य आपल्यावरंच; आपणच दिलेलं. पकडायचं आपणच - आपल्यालाच! अचंबा वाटावं असं सारं काही असताना कशाचंच काहीच वाटू न देता
रडीचा डाव खेळत राहायचं न जिंकता.
लिहिण्यापूर्वीच शब्दांची निरार्थकता कळत जाताना डिलिट होत राहतात अनेक शब्द पण बोलण्यापूर्वीची त्यांच्यातल्या अनेकांची निरार्थकता का कळू नये हा प्रश्न पडत राहातो...नको तेव्हा! मग लिहिणं टळत असताना कधी बोलणं टळत राहतं आपलं आपणच. मुके होत नसलो आपण तरी सोयीची मौनं घेरतात आपल्याला. त्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या तीव्र शांततेत वावरणारे आपण बहिरे होतो...आंधळेही... आणि अधूही.
गाळणी बसते, चाळत राहते. छळत राहते.
निषेध करतो. त्रिवार करतो. हॅशटॅगतो. बघतो. सवयीचे होतो. बोथटतो. जगतो...मरत मरत.

लिहायला घेते मनातल्या मनात असं बरंच काही. पण बऱ्याचदा भेटत राहतात माणसं. माणसांची बनलेली. मग शब्दांच्या माणसी रचनेला महत्व उरत नाही. घुसमटतात मग ही माणसाळलेली अक्षरे आणि हे शब्द जे भाषांच्या मर्यादेत अडकत राहतात. ज्यांच्या अर्थातल्या संकल्पनांना एकवेळ नसेल मर्यादा पण उच्चाराला अर्थ लगडतो एखाद्या सीमित भाषाविश्वाचा. मग ते मराठी होतं, इंग्लिश ,कन्नडा, तेलगू किंवा हिंग्लिश होतं. त्यांच्या शुद्धाशुद्धतेच्या कसोट्या लागतात डोकं वर काढायला. ती छाटणारेही असतात आजूबाजूला...
कधी सशस्त्र कधी निशस्त्र.
कधी बोलघेवडे,कधी न बोलून शहाणे.

लिहिणं जगणं असतं काहींचं.
काहींचं जगणं लिहिण्यात उतरतं.
बंद मुठीत वाळू घ्यावी, मग ती निसटून जावी त्या बंदिस्ततेतून. हाताला चिकटलेली वाळू तेवढी खुण असते त्या अनुभवाची. तसंच होतं.
लिहायला घेते मनातल्या मनात बऱ्याचदा पण हाताशी तेच राहतं जे अनायसे राहिलं हाताशी.
जे हवं हवं म्हणून ध्यास धरला ते त्याच हव्यासापोटी निसटून जात राहतं. त्याच्या सुटकेचा क्षण दिसत राहतो पण पकडता येत नाही... वाळूला हातात, 'त्या'साऱ्याला शब्दांत.

लिहायला घेते मी मनातल्या मनात बऱ्याचदा...
भरकटत राहतं मग असं इतर सगळंच;
#त्या_आशयाभोवती.



-प्राजक्ता.

No comments:

Post a Comment