Thursday 25 August 2016

अंतरं...

माणसांपेक्षा अंतरांशी करार करावेत. समांतर वाटचाली असं काही नसतंच पण अंतर असतं हे खरंच. अंतरांचं असणं एकदा स्वीकारलं कि मग जाणिवेच्या पातळीवर हा निर्णय उगवतो की ते पार करायचं अथवा नाही. काहीवेळेस काहीप्रमाणात ते पार केले जाते. प्रमाण हे वेळेनुसार बदलणार. म्हणजे कमी जास्त होत जाणार. त्यामुळे कायमच ते सम नसणार. समांतर नसणार. अशी समांतर फक्त यंत्रे धावू शकतात रुळावर आणि यंत्रांमध्ये आरूढ आपण ती फसवी सादृश्यता(ऍनालॉजि) स्वतःसाठी आणि इतरांमधल्या आखलेल्या किंवा आखल्या गेलेल्या अंतरांविषयी ग्राह्य धरू लागतो. त्यामुळे शाळेत जरी असं भासवलं जात असलं की "प्रत्येकीनेच एका हाताचं अंतर ठेवून सगळ्या कसरती पार पाडायच्या हे शक्य आहे",तरी ती अंतरं कमी जास्त होत असतात हे आपणही अनुभवलेले असते. काहींसोबतचे अमुक इतके अंतर खूप जास्त वाटते तर काहींसोबत तेच  अंतर खूप कमी तर काहींसोबतच्या अंतराचा हिशेब ठेवण्याइतकेही महत्व आपण त्याला देत नाही.
अंतराचा मान राखायचं विसरलो आपण कि अंतरे आपला मान नाही राखत. असं परस्परावलंबी हे नातं.म्हणजे खरं नातं हे आपण आणि कोणी एक  व्यक्ती यात असतं कि आपल्यात आणि आपल्या दोघांमधल्या अंतरात असतं; हे कळत नाही... धूसर होत जातं चित्र आणि पर्यायाने नाती.

तर हेच. अंतर खरी . ती टिकणारी. माणसं बदलतात. तुम्ही बदलता. अंतर आणि माणसं यांच्या जोड्या गुणोत्तरे बदलतात पण अंतरं असतातच. त्याचं अगदी उदात्तीकरण करणंही काही गरजेचं नाही. तसं करणं हे आपल्या कल्पनाविश्वातील अद्भुतरम्यतेचा भयंकर तुटवडा असल्याचं लक्षण आहे असं म्हणावं फारतर. चालत राहिलं कि हे असले अंतर मोजण्याचे चोचले सुचत नाहीत. रेंगाळत राहिलं कि मग काय वाऱ्याने हलणारी पाने किती आणि त्या पानांच्या धक्याने हलणारी पानं किती याचा तक्ता मांडत बसतो आपण. हलत राहणं महत्वाचं. चालत राहणं महत्वाचं. करार करत राहणं-मोडत राहणं महत्वाचं.

-प्राजक्ता.

No comments:

Post a Comment